हुपरी : हुपरी (ता. हातकणंगले) येथे उभारण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या उभारणीमध्ये ग्रामपंचायतीकडून जाणीवपूर्वक दिरंगाई करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ स्मारक समितीच्या सदस्यांनी बुधवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांशी आंदोलनकर्त्यांची झटापट झाली. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करीत आंदोलनकर्त्यांवर लाठीमार केला व रॉकेलचे कॅन हिसकावून घेतले. झटापटीमध्ये आंदोलनकर्त्यांबरोबर पोलिसांच्या अंगावरही मोठ्या प्रमाणात रॉकेल पडल्याने त्यांनी रॉकेलमध्ये आंघोळ केल्याचे चित्र पाहावयास मिळाले. पोलिसांनी आंदोलकर्त्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.दरम्यान, याप्रश्नी स्मारक समिती सदस्य, ग्रामपंचायत पदाधिकारी यांची समाजकल्याण सभापती किरण कांबळे, आरपीआयचे राज्य सचिव मंगलराव माळगे, सरपंच दीपाली शिंदे, उपसरपंच राजेंद्र सुतार, आदींशी पोलीस ठाण्यात संयुक्त बैठक घेण्यात आली. स्मारक उभारणीसाठी होत असलेल्या दिरंगाई व स्मारक समिती सदस्यांकडून वेळोवेळी घेण्यात येत असलेली बदलाची भूमिका या कारणांवरून दोन्हीकडून परस्पर आरोप-प्रत्यारोप झाले. यावेळी किरण कांबळे, मंगलराव माळगे, सहायक पोलीस निरीक्षक मधुकर कांकडे यांनी मध्यस्थी करून बैठकीमध्ये शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. स्मारकाची उभारणीही गतीने करून ३० एप्रिलपर्यंत काम पूर्ण करून नागरिकांना स्मारक खुले करून देण्याचे लेखी आश्वासन ग्रामपंचायतीने यावेळी स्मारक समितीला दिले. या आश्वासनाची पूर्तता न झाल्यास ग्रामपंचायत सदस्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा समितीचे अध्यक्ष डॉ. सुभाष मधाळे यांनी दिला. त्यानंतर आंदोलन स्थगित करीत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, ग्रामपंचायत मागासवर्गीय कल्याण निधीतून येथील शाहूनगरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरामध्ये मुंबईतील चैत्यभूमीची प्रतिकृती असणाऱ्या स्मारकाची उभारणी करण्यात येत आहे. या स्मारकामध्ये डॉ. बाबासाहेबांच्या पवित्र अस्थी ठेवण्यात येणार आहेत. संपूर्ण आंबेडकरी जनतेच्या भावनेशी या स्मारकाची नाळ जोडली जाणार असतानाही केवळ ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे गेल्या पाच-सहा वर्षांपासून अत्यंत मंदगतीने स्मारकाची उभारणी केली जात आहे. त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. स्मारकाच्या पूर्ततेसाठी ग्रामपंचायतीकडून वेळोवेळी मिळणाऱ्या आश्वासनाला वैतागून स्मारक समितीच्या सदस्यांनी बुधवारी सकाळी आत्मदहनाचा प्रयत्न केला. समिती सदस्य शाहूनगरमधून मोर्चाने निषेधाच्या घोषणा देत ग्रामपंचायत कार्यालयासमोर आले. पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी रॉकेलसह कार्यालयात जात असल्याचे पाहून पोलिसांनी त्यांना अडविले. यावेळी पोलीस आणि आंदोलनकर्त्यांत मोठ्या प्रमाणात झटापट झाली. या गोंधळातच आंदोलनकर्त्यांनी रॉकेल ओतून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संपूर्ण रॉकेल पोलीस व आंदोलनकर्त्यांच्यात अंगावर सांडले गेले. पोलिसांनी लाठीमार करण्यास सुरुवात केली. तसेच आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस गाडीत बसविण्यात आले. या सर्वांना पोलीस ठाण्यात आणून बैठकीनंतर सोडून देण्यात आले. यावेळी डॉ. मधाळे, विद्याधर कांबळे, मोहन शिंगाडे, आदींनी या आंदोलनात सहभाग घेतला. (वार्ताहर)
हुपरीत आंदोलकांचा आत्मदहनाचा प्रयत्न
By admin | Updated: April 2, 2015 00:37 IST