कोल्हापूर : जिल्ह्यामधील वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे पालकांची आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. याचा विचार करून चालू शैक्षणिक वर्षामध्ये खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक शाळांनी विद्यार्थ्यांकडून प्रवेश फी आकारू नये, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे सभापती प्रवीण यादव यांनी समितीच्यावतीने केले आहे.
समितीची शुक्रवारी मासिक बैठक झाली. त्यामध्ये असे आवाहन करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या ऑनलाइन शिक्षण प्रणाली सुरू आहे. त्याचा आढावा सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून या वेळी घेण्यात आला. काही शाळांमधील शिक्षकांना कोरोना कामकाजासाठी आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे शैक्षणिक अध्यापन, समूह अध्यापन प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे उर्वरित सर्व शिक्षकांनी उपस्थित राहून ऑनलाइन करावे, अशा सूचना देण्यात आल्या. विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यादृष्टीने कामकाज करावे, अशी सूचना करण्यात आली.
शाळांमध्ये जि.प.स्वनिधीअंतर्गत वॉटर फिल्टर, क्रीडा साहित्य, प्रयोगशाळा साहित्य जिल्हा परिषद सदस्यांच्या शिफारशीने शाळांना तत्काळ वितरित करावे, ज्या शाळांच्या इमारती धोकादायक आहेत, त्यांची प्रत्यक्ष पाहणी गटशिक्षणाधिकारी यांनी करून नवीन इमारत बांधकाम अथवा दुरुस्तीचे प्रस्ताव प्राधान्यक्रमानुसार जि. प. मतदारसंघनिहाय यादी तयार करून तत्काळ सादर करावेत, अशा सूचना करण्यात आल्या.
या वेळी समिती सदस्य भगवान पाटील, विनय पाटील, अनिता चौगले यांनी प्रत्यक्ष तर वंदना जाधव, प्रियांका पाटील, रसिका पाटील यांनी ऑनलाइन सहभाग घेतला. या वेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे, माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार, सर्व गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.