शाहूवाडी तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्वच पर्यटन स्थळांवर कडक बंदोबस्त आहे. बर्की येथे रविवारी सकाळपासूनच पोलीस, महसूल व आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनी बर्की पुलावर वाहन परवाना, कोरोना तपासणी सुरू करून पर्यटकांना धबधब्यावर जाण्यास मनाई केली. त्यामुळे दिवसभर पोलिसांशी वादावादीचे प्रसंग सुरू होते. येणाऱ्या प्रत्येकाची कोरोना चाचणी होते हे समजल्यावर काही पर्यटकांनी निम्म्यातूनच परतीचा मार्ग धरला. तरीही दुपारपर्यंत सव्वाशे पर्यटकांची कोरोना तपासणी करण्यात आली. या ठिकाणी काही मद्यधुंद तरुणांना पोलिसांनी काठीचा प्रसाद देऊन हाकलून लावले. यावेळी मंडल अधिकारी राजेंद्र सुतार,तलाठी प्रकाश मिठारी, सागर जगताप, तलाठी चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल अविनाश वरुटे, मांजरे प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी, कोतवाल श्रीकांत सावंत, संदीप कांबळे, आशा सेविका वंदना खामकर उपस्थित होते.
फोटो:- रविवारी बर्की धबधबा मार्गावर पोलीस,महसूल विभाग व आरोग्य विभाग यांच्यावतीने पर्यटकांची कोरोना तपासणी करण्यात आली.