उत्तूर : उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघात कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी बाधित गावांत दहा दिवस कडक संचारबंदी करा, असा आदेश राज्याचे ग्रामविकास व कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी उत्तूर येथील महसूल कार्यालयात बोलावण्यात आलेल्या आढावा बैठकीत दिला. सरपंच वैशाली आपटे अध्यक्षस्थानी होत्या.
मुश्रीफ म्हणाले, कोरानाची दुसरी लाट प्रचंड प्रमाणात आहे. त्याचे स्वरूप वेगळे आहे. ग्रामस्थांनी दक्ष राहून आरोग्य तपासणी यंत्रणेला सहकार्य केले पाहिजे.
प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी यांनी, उत्तूर परिसरात स्थानिक संसर्ग अधिक आहे. ग्रामस्थ आपली लक्षणे सांगत नसल्याने रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे सांगितले. बाधित गावांत कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. ग्रामपंचायतींना समित्या करण्याबाबतच्या सूचना केल्याचे ते म्हणाले.
यावेळी जि. प. सदस्य उमेश आपटे, वसंत धुरे, पं. स. सदस्य शिरीष देसाई, मारुती घोरपडे, काशिनाथ तेली, भिवा जाधव, विजय वांगणेकर, विठ्ठल उत्तूरकर, महेश करंबळी, तहसीलदार विकास अहिर, गटविकास अधिकारी बी. डी. वाघ, तालुका वैद्यकीय अधिकारी सोनावणे, पोलीस निरीक्षक बालाजी भांगे, मंडल अधिकारी प्रशांत गुरव, डॉ. समीर तौकरी, ग्रामसेवक राजेंद्र नुल्ले आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
चौकट :
आजरा, उत्तूर येथील कोविड सेंटरला दररोज रेमडेसिविरचा पुरवठा करण्याचा आरोग्य अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आला. यावेळी खासगी दवाखान्यांनी रुग्णांची माहिती दररोज सरकारी यंत्रणेला द्यावी अन्यथा कारवाई करणार असल्याचा इशारा खिलारी यांनी दिला. वाढते रुग्ण कोविड सेंटरला ने-आण करण्यासाठी रुग्णवाहिका द्या, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. रुग्णवाहिका उपलब्ध करून देत असल्याचे मुश्रीफ यांनी नमूद केले.
आजरा, चंदगड, गडहिंग्लज येथील रुग्णांसाठी एच.आर.सी.टी. तपासणी करण्यासाठी जिल्हा नियोजन विभागातून निधीची तरतूद करणार असल्याची ग्वाही मुश्रीफ यांनी दिली.
फोटो : २८ उत्तुर मुश्रीफ
उत्तूर येथील कोरोना आढावा बैठकीत बोलताना ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ. यावेळी सरपंच वैशाली आपटे, वसंत धुरे, उमेश आपटे, प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी, तहसीलदार विकास अहिर, गटविकास अधिकारी बी. डी. वाघ.