मुरगूड : शेतकऱ्यांना एकरकमी ‘एफआरपी’ची रक्कम साखर कारखान्यांनी द्यावी याबाबत जिल्ह्यात आंदोलन सुरू आहे. जर शासनाने व कारखानदारांनी तत्काळ याबाबत निर्णय घेतला नाही, तर शिवसेना या आंदोलनाची व्याप्ती वाढवेल. संपूर्ण जिल्हा चक्का जाम करू, असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी दिला. या मागणीसाठी मुरगूड (ता. कागल) मध्ये निपाणी-राधानगरी मार्ग शुक्रवारी काही काळ शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रोखून धरला. मागण्यांचे निवेदन शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी साखर सहसंचालक कार्यालयातील विशेष लेखा परीक्षक धनंजय पाटील व सहा. अधिकारी रमेश बार्डे यांना दिले. यावेळी देवणे म्हणाले, महाराष्ट्रात दुष्काळग्रस्त परिस्थिती, वीज व बी-बियाणे, खते यांचा उत्पादन खर्च यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. त्यामुळे साखर कारखाने लवकर सुरू झाले आहेत, पण याला एक महिना उलटला तरी अद्याप कोणत्याच कारखान्याने ऊसदराबाबत किंवा एफआरपीबाबत तोंड उघडले नाही. १४ दिवसांच्या आत एफआरपी देणे कायद्याने बंधनकारक असल्याने कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या सर्व कारखान्यांवर व त्यांच्या संचालकांवर फौजदारी दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली. यावेळी उपजिल्हा प्रमुख संभाजीराव भोकरे, जिल्हा महिला संघटक सुषमा चव्हाण, माजी आमदार संजय घाटगे, दिग्विजय पाटील, सागर मोहिते, दिलीप तिप्पे, मारुती पुरीबुवा, रामा चौगले, निवृत्ती पाटील, अरविंद बुजरे, प्रभाकर कांबळे, दत्ता साळोखे, चंद्रकांत पाटील, आदी शिवसैनिक उपस्थित होते. इचलकरंजीत ऊसदरासाठी शिवसेनेचे निवेदन इचलकरंजी : एफआरपीप्रमाणे दर न देणाऱ्या साखर कारखान्यांवर कडक कारवाई करावी, यासह विविध मागण्यांसाठी शुक्रवारी शहर शिवसेनेच्यावतीने प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला. शिवसेना कार्यालयापासून प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी निदर्शने करण्यात आली. त्यानंतर शिष्टमंडळाच्यावतीने प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, धनाजी मोरे, मलकारी लवटे, सयाजी चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
मुरगूडमध्ये शिवसेनेचा रास्ता रोको
By admin | Updated: November 28, 2015 00:15 IST