कोल्हापूर : शहरात विविध ठिकाणी घरफोडी करणाऱ्या राजेंद्रनगरमधील सात सराईत महिला चोरट्यांना जुना राजवाडा पोलिसांनी आज, मंगळवारी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली. त्यांच्याकडून सुमारे ४५ हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. याबाबत पोलिसांनी सांगितले, जुना राजवाडा पोलीस काल, सोमवारी महालक्ष्मी मंदिर परिसरात पेट्रोलिंग करत असताना त्यांना रेकॉर्डवरील महिला गुन्हेगार छाया सोनटक्के व बायडी रसाळ, अश्विनी नाईक संशयितरीत्या फिरताना आढळल्या त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सुरेश अनंत नानिवडेकर (रा. कोष्टी गल्ली, मंगळवार पेठ) यांच्या घरातून सुमारे ४५ हजार किमतीची पितळी भांडी चोरून नेल्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांच्या अन्य महिला साथीदारांनाही पोलिसांनी अटक केली. त्यांनी शाहूपुरी, राजारापुरी, आदी परिसरात घरफोड्या केल्याची कबुली दिली. (प्रतिनिधी) अटक केलेल्या महिलांची नावे : संशयित छाया राजू सोनटक्के (३०), बायडी सागर रसाळ (२५), अश्विनी दत्ता नाईक (२४), ताई ऊर्फ तायडी वाल्मिक फुलोरे (३५), अनिता विनायक चांदणे (२५), सत्यभामा व्यंकट घोलप (६०), सुरेखा राजू नरदे (२८, सर्व रा. राजेंद्रनगर झोपडपट्टी)
राजेंद्रनगरमधील महिला चोरट्यांना अटक
By admin | Updated: December 10, 2014 00:18 IST