मानव, पशू-पक्षी यांना घातक ठरणारे फॉरेट कीटकनाशक कृषी विभागाच्या भरारी पथकाने कुंभोज ता. हातकणंगले येथे छापा टाकून पकडले आहे. बापूसो कृषी सेवा केंद्र मधून ६५ हजार किमतीचे १८७ किलो प्रतिबंधित फॉरेट कीटकनाशकांचा साठा शनिवारी दुपारी जप्त करुन दुकान मालक मदन लक्ष्मण अणूसे रा. वाठार तर्फे उदगाव यांच्या विरुद्ध हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
केंद्र आणि राज्य शासनाने सुरक्षेच्या कारणास्तव २०१७ ला बंदी घातलेले फॉरेट कीटकनाशक कुंभोज येथील बापूसो कृषी सेवा केंद्राकडून सोशल मीडिया, व्हाॅटस्अॅप च्या माध्यमातून विक्री केली जात असल्याची माहिती खबऱ्यामार्फत कृषी विभागाच्या भरारी पथकाला मिळाली होती. या भरारी पथकाने छापा टाकून प्रतिबंधित फाॅरेट कीटकनाशकांचा साठा पकडला. जे. बी. सी. कॉपसायन्स वापी ( गुजरात ) आणि गुजरात किसान फर्टिलायझर कंपनी राजकोट या कंपनीकडून बापूसो कृषी सेवा केंद्राचे मालक मदन आणूसे हे फॉरेट कीटकनाशकांची ट्रान्सपोर्ट द्वारे मागणी करत होते. या कंपनीकडून पाठवलेल्या बिलावर आणि ट्रान्सपोर्ट इनव्हॉइस वर सेंद्रिय खत आणि स्प्रे- पंपचा उल्लेख करुन त्यामध्ये फॉरेट कीटकनाशक भरून ते दुकानदाराकडे पाठवत होते. बापूसो कृषी सेवा केंद्राकडून या फॉरेट कीटकनाशकाची व्हाॅटस्अॅप द्वारे विक्री केली जात होती.
शासनाने बंदी घातलेले फॉरेट कीटकनाशकांची विक्री करुन शेतकरी आणि शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी मदन लक्ष्मण अणूसे रा. वाठार तर्फे उदगाव यांच्या विरुद्ध भरारी पथकाचे तंत्र निरीक्षक बंडा कुंभार यांनी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला. या कारवाईत कोल्हापूरचे विभागीय कृषी सह संचालक उमेश पाटील, राज्यस्तरीय पथकातील कृषी उपसंचालक अशोक बाणखेले,प्रवीण कदम,तंत्र अधिकारी,प्रल्हाद साळुंखे व नंदकुमार मिसाळ यांनी सहभाग घेतला.
फोटो = बापूसो कृषी सेवा केंद्र कुंभोज येथे फॉरेट कीटकनाशकांचा साठा जप्त करताना कृषी विभागाचे फरारी पथक.