चंदगड :
गारगोटी-गडहिंग्लज-मलगेवाडी-नागनवाडी-चंदगड-तिलारी रस्त्याचे काम भारत सरकारच्या अंतर्गत जितेंद्रसिंह प्रा. लि. ग्रुप तर्फे गारगोटी तिलारी प्रोजेक्ट अंतर्गत हा रस्ता केला जात आहे. मात्र, या रस्त्याचे चंदगड तालुक्यातील मलगेवाडीपासून नागनवाडी-चंदगडमार्गे तिलारीपर्यंत होणारे काम खूप संथगतीने सुरू आहे.
रस्त्याच्या एका बाजूला चर खोदून ठेवल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. रस्त्यामध्ये जागोजागी खड्डे असल्याने वाहनधारकांना वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे हे काम पावसाळ्यापूर्वी लवकरात लवकर पूर्ण करावे, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे.
याबाबतचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना चंदगड नगरपंचायतीचे गटनेते दिलीप चंदगडकर, जि. प. सदस्य सचिन बल्लाळ, शांताराम पाटील, गोपाळ कोकरेकर, विनायक पाटील आदींनी दिले आहे. मलगेवाडीपासून नागनवाडी-चंदगड मार्ग तिलारीपर्यंतचा रस्ता अनेक वर्षांपासून प्रलंबित असून त्याचे काम खूप संथगतीने होत आहे. या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करून वाहनधारकांना दिलासा द्यावा अशी मागणी निवेदनातून केली आहे.
--------------------------
* फोटो ओळी : चंदगड सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्यांना दिलीप चंदगडकर यांनी निवेदन दिले. यावेळी सचिन बल्लाळ, शांताराम पाटील, गोपाळ कोकरेकर, विनायक पाटील आदी उपस्थित होते.
क्रमांक : ०२०४२०२१-गड-११