इचलकरंजी : संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थींना गेल्या सहा महिन्यांपासून अनुदान मिळत नसल्याने त्यांची ससेहोलपट होत आहे. यामध्ये लक्ष घालून न्याय द्यावा, अशा मागणीचे निवेदन लाभार्थींच्या शिष्टमंडळाने आमदार प्रकाश आवाडे यांना दिले. त्यावर प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्यासोबत बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन आवाडे यांनी दिले.
संजय गांधी निराधार योजनेतील पात्र लाभार्थींना मंजुरी मिळून एक वर्ष झाले तरी त्यांना अनुदान मिळाले नाही. त्याचबरोबर जुन्या लाभार्थींना गत सहा महिन्यांपासून अनुदान मिळाले नाही. वर्षभरात तीनवेळा बैठका झाल्या; परंतु कार्यवाही झाली नाही. कोरोनाचे कारण सांगत काहीजणांचे अर्ज स्वीकारले नाहीत. अशा विविध अडचणी यावेळी शिष्टमंडळाने मांडल्या. शिष्टमंडळात सुखदेव माळकरी, कोंडिबा दवडते, विद्या सुतार, बाळासाहेब जाधव, रोहिणी पोळ आदींचा समावेश होता.
(फोटो ओळी)
११०१२०२१-आयसीएच-०५
संजय गांधी योजनेचे अनुदान मिळत नसल्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी लाभार्थींच्या शिष्टमंडळाने आमदार प्रकाश आवाडे यांना मागण्यांचे निवेदन दिले.