कोल्हापूर : पोलीस दलाची बिनतारी संपर्क व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल ठरलेली ‘डिजिटल मोबाईल रेडिओ यंत्रणा’ जिल्ह्यात नुकतीच सुरू करण्यात आली. या यंत्रणेचा प्रारंभ पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आला. मोबाईलच्या युगात पोलिसांच्या बिनतारी संपर्काचे महत्त्व आजही अबाधित असून आपत्कालीनप्रसंगी भरवशाचे संपर्क साधन म्हणून या यंत्रणेकडे पाहिले जाते. एकाचवेळी जिल्ह्यातील सर्व पोलिसांशी वेगाने संपर्क करून संदेश पोहोचविण्याची क्षमता पोलिसांच्या बिनतारी संपर्क व्यवस्थेमध्ये आहे. अशावेळी स्पष्ट आवाज आणि कुठूनही संपर्क होणे या बाबींना महत्त्व असते. कोल्हापूर पोलिसांकडे नवीन डिजिटल संदेश वहन प्रणाली आल्यामुळे या दोन्ही बाबी साध्य झाल्या असून पोलिसांच्या बिनतारी संपर्क यंत्रणेने आता कात टाकली आहे. ही यंत्रणा कार्यान्वित होण्यापूर्वी पारंपरिक अॅनालॉग प्रणालीवरुन संदेशवहन होत होते. या यंत्रणेमध्ये अनेक त्रुटी होत्या. आवाज स्पष्ट नसल्याने अनेक वेळा पुन: प्रक्षेपण करावे लागत होते. त्याचबरोबर नॉईज असल्याने कॉल पुन्हा प्रक्षेपित करावे लागत होते. याप्रसंगी गृहपोलीस उपअधीक्षक किसन गवळी, उपअधीक्षक चंद्रकांत ढाकणे, अरुण डुंबरे आदींसह नियंत्रण कक्षातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. हायपॉवर डिजिटल यंत्रणा जिल्ह्यात कार्यान्वित झाल्याने पोलिसांची संपर्क यंत्रणा अधिक सक्षम झाली आहे. ‘स्पष्ट आवाज आणि गोपनीयता’ या डिजिटल यंत्रणेच्या वैशिष्ट्यांमुळे संदेश वहन करणे सोपे झाले आहे. भविष्यात वॉकीटॉकीवरून मोबाईलसारखा मेसेज पाठवणे, कॉल करणाऱ्या व्यक्तीचे जीपीएस लोकेशन नियंत्रण कक्षात दिसणे, डेटा मेसेजिंग सुविधा पोलिसांसाठी उपलब्ध करणार आहेत. - डॉ. मनोजकुमार शर्मा, पोलीस अधीक्षक
‘डिजिटल मोबाईल वायरलेस’चा प्रारंभ
By admin | Updated: April 10, 2015 00:37 IST