कोल्हापूर : कोरोना संसर्गाची दुसरी लाट एप्रिल महिन्यात सुरू झाली. त्यानंतर राज्य शासनाने ज्या जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग जादा आहे, त्या जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंध लागू केले. त्यामुळे विनाकारण फिरणाऱ्या व मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारत शहर वाहतूक शाखेने दोन महिन्यांच्या कालावधीत तब्बल ६६ लाख ३६ हजार ५०० इतका दंड वसूल केला आहे.
कोल्हापूर जिल्ह्याचा कोरोना संसर्गाचा दर चढाच असल्यामुळे राज्य शासनाने केलेल्या वर्गवारीनुसार जिल्ह्याचा समावेश चौथ्या वर्गवारीत होत आहे. यात कोरोनाबाधितांची संख्या एक हजाराच्यावर आहे, तर मृत्यूसंख्या ३०च्या वर आहे. त्यामुळे ही कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना करत आहे. त्याला विनाकारण फिरणाऱ्या वाहनधारकांकडून बाधा येऊ लागली आहे. विशेषत: अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता अन्य खासगी कर्मचाऱ्यांवर निर्बंध अजूनही आहेत. तरीसुद्धा अनेक जण भाजीपाला, औषधे असे आणण्याच्या नावाखाली विनाकारण फिरत आहेत. योग्य उत्तर व पुरावे सादर न केल्यामुळे शहर वाहतूक शाखेकडून अशा वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. या कारवाईचा उद्देश केवळ दंड वसूल करणे नसून कोरोनाची साखळी तोडणे हा आहे. तरीसुद्धा या जीवघेण्या रोगाच्या भीतीपेक्षा अनेक युवक विनाकारण फिरत आहेत. अशा विनाकारण फिरणाऱ्यांवर कायद्याचा बडगा असावा, याकरिता जिल्हा पोलीस दल व त्या अंतर्गत काम करणाऱ्या शहर वाहतूक शाखेकडून वाहने जप्तीसह दंड वसूल केला जात आहे. यात मोटरवाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवरही दंड व जप्तीची कारवाई केली जात आहे. ही कारवाई १५ एप्रिल २०२१ पासून आजपर्यंत सुरू आहे. या कालावधीत शाखेने ६६ लाख ३६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. यात परवाना नसणे, ट्रीपल सीट वाहन हाकणे, विना हेल्मेट प्रवास करणे, विना नंबरप्लेट वाहन चालविणे, विना परवाना वाहन चालविणे आदी कायद्यांचे उल्लंघनाचा समावेश आहे.
सर्वाधिक विना नंबरप्लेटमधून दंड वसुली
गेल्या दोन महिन्यांत शहर वाहतूक शाखेने केलेल्या कारवाईत प्रामुख्याने शहरातील अनेकांच्या वाहनांवर वाहन क्रमांकाची प्लेट नसल्याचे समोर आले आहे. अशा ३ हजार ९४५ जणांवर या अंतर्गत कारवाई करत ८ लाख ३ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
तब्बल २६ हजार जणांकडे परवाना नाही
गेल्या दोन महिन्यांत वाहतूक शाखेने केलेल्या कारवाईत २६ हजार २८१ जणांकडे वाहन चालविण्याचा परवानाच नसल्याचे निष्पन्न झाले आहे. हजारो जण असेच विनापरवाना वाहन चालवत होते. त्यांच्याकडून तब्बल ५ लाख २५ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
शहरांतर्गत सर्वाधिक कारवाई
शहरातील बिंदू चौक, दसरा चौक, राजारामपुरी, राजारामपुरी १२ वी गल्ली माउली चौक, शिवाजी पूल, शाहू जकात नाका, ताराराणी चौक, दाभोळकर काॅर्नर, ताराबाई पार्क या भागात सर्वाधिक कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यात युवा वर्गाचा समावेश अधिक आहे. अनेक जणांकडे वाहन चालविण्याचा परवाना नसल्याचे पुढे आले आहे.
कारवाई अशी (ग्राफ )
कारवाईचा प्रकार केसेस दंड
ट्रिपल सीट - ६८० १,३६,०००
विना मास्क - ४५३ २,२६,५००
नो पार्किंग - १, १०८ २,२१,६००
मोबाइलवर बोलणे ९५९ १,९१,८००
विना नंबरप्लेट ३,९४५ ८, ०३,४००
विना लायसेन्स २६, २८१ ५, २५,६००
कोट
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पोलीस दलाचे कर्मचारी रात्रंदिवस कार्यरत आहेत. तरीसुद्धा अनेक जण विनाकारण फिरत आहेत. त्यामुळे संसर्ग रोखण्याऐवजी वाढत आहे. वाहतूक शाखेचा दंड करणे, हा उद्देश नसून जीवघेणा संसर्ग रोखणे हा उद्देश आहे. सहकार्य करा आणि घरातच सुरक्षित राहा.
- स्नेहा गिरी, पोलीस निरीक्षक ,शहर वाहतूक शाखा, कोल्हापूर