कोल्हापूर जिल्ह्यात माध्यमिक शाळांमधील ६ हजार ६२२ माध्यमिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अजूनही लस घेतलेली नाही. त्यामुळे जरी शाळा सुरू करायचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला तरी मुले शाळेत कशी पाठवायची असा प्रश्न पालकांसमोर उपस्थित होत आहे.
जानेवारी २०२१ पासून कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरूवात झाली. सुरूवातीच्या काळात लस मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होती. परंतू ती घेण्यासाठी नागरिक उत्स्फूर्तपणे पुढे येत नव्हते. नागरिकच नव्हे तर आरोग्य खात्यातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारीही फारशा उत्साहाने लस घेण्यासाठी पुढे येत नव्हते. अखेर जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, महानगरपालिका यांना यासाठी जनजागरण करण्याची भूमिका घ्यावी लागली.
शाळा कधीही सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर सर्व शिक्षकांनी लसीकरण करून घेण्याच्या सूचना ग्रामविकास आणि शालेय शिक्षण विभागाने दिल्या होत्या. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील ८ हजार ५३० माध्यमिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लसीकरण करून घेतले आहे. मात्र अजूनही ६ हजार ६२२ जणांनी लस घेतलेली नाही. जर शिक्षकांचे लसीकरण झालेले नसेल तर अशा शाळांमध्ये मुलांना कसे पाठवायचे असा प्रश्न पालकांसमोर उभा ठाकला आहे.
चौकट
अ. न. तालुका माध्य.शिक्षक व कर्मचारी लसीकरण झालेले
१ आजरा ४०० २३९
२ भुदरगड ४९६ २२१
३ चंदगड ९३० ६९०
४ गडहिंग्लज ९९५ ७३४
५ गगनबावडा १७४ ११०
६ हातकणंगले २८३१ १८१४
७ कागल १३९८ ८७९
८ करवीर १६५८ ९०८
९ पन्हाळा १२४८ ३५४
१० राधानगरी ८७८ ४३७
११ शाहूवाडी ६४० ३९६
१२ शिरोळ १३९२ ९५९
एकूण १५१५२ ८,५३०
कोट
ज्या शिक्षकांनी अजूनही लसीकरण करून घेतलेले नाही. त्यांना लसीकरणाबाबत सूचना दिल्या आहेत. शाळा सुरू करण्याबाबत शासनाचा निर्णय झाला तर शिक्षकांचे लसीकरण झालेले नाही असे होवू नये यासाठी सक्त सूचना दिल्या आहेत.
किरण लोहार
माध्यमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर