कोल्हापूर : राज्य शासनाने एक तर महामडंळाचे शासनात विलिनीकरण करावे किंवा शासनाच्या बजेटमध्ये समावेश करावा. अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली. जिल्हा काँग्रेस कमिटीत रविवारी संघटनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्य सरचिटणीस ॲड. गुलाबराव घोरपडे होते.
बरगे म्हणाले, एसटीचे कोरोनामुळे गेल्या अठरा महिन्यांत साडेचार हजार कोटींचे उत्पन्न बुडाले आहे. संचित तोटाही नऊ हजार कोटींच्या आसपास गेला आहे. अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत होत नाहीत. दिवसेंदिवस महामंडळाची स्थिती बिकट होऊ लागली आहे. वेळेत पगार न झाल्याने कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कायमस्वरुपी तोडगा म्हणून शासनाने महामंडळाचे विलिनीकरण करावे किंवा महामंडळाचे बजेट शासनाच्या बजेटमध्ये समाविष्ट करावे. याबाबतचे निवेदन भाई जगताप यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे दिले आहे. ॲड. घोरपडे म्हणाले, पालकमंत्री सतेज पाटील यांनी कर्मचाऱ्याचे पगारासाठी २७०० कोटी रुपयांचे वेतनासाठी दिले आहेत. त्यांनी विलिनीकरणासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. संघटनेचे उपाध्यक्ष संजीव चिर्कुडेकर यांनी स्वागत केले. या वेळी बी.आर. साळोखे, संघटक सुभाष वगरे,कार्याध्यक्ष एस. वाय.पोवार, खजिनदार बी. डी. शिंदे, नामदेव भोसले,संजय सासणे, ए. जे.चौगुले, मियालाल पटवेगार,सुनील फल्ले, बाळासो माने,बालम बागवान, वैशाली पाटील आदी उपस्थित होते.
फोटो : १२०९२०२१-कोल-एसटी मेळावा ०२
आेळी : जिल्हा काँग्रेस कमिटीत रविवारी झालेल्या महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसच्या मेळाव्यात सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बी.आर.साळोखे, ॲड. गुलाबराव घोरपडे, संजीव चिकुर्डेकर,विजय भोसले उपस्थित होते.