कोल्हापूर : खून, खुनाचा प्रयत्न, जबरी मारहाण, लुटमार, दरोड्यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या ‘एसटी’ गँगचा म्होरक्या गुंड स्वप्निल तहसीलदारसह त्याच्या पाच साथीदारांवर एक वर्षासाठी हद्दपारीची कारवाई करण्यात आली. याप्रकरणी तत्काळ संबंधितांना नोटिसा बजावण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी शाहूपुरी पोलिसांना शनिवारी दिले. मुक्त सैनिक वसाहत परिसरातील मैदानावर गुंड तहसीलदार याने वाढदिवस कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम पोलिसांनी उधळून लावला होता. नुकतीच झालेली महापालिका निवडणूक स्वत: तहसीलदार लढविण्याच्या तयारीत होता; परंतु पोलिसांनी अटकाव केल्याने त्याने नात्यातील महिलेला उभे केले. तहसीलदार हा पोलीस रेकॉर्डवर असल्याने त्याच्या संघटित गुन्हेगारीमुळे कायदा व सुव्यवस्था बिघडली जात आहे. त्यामुळे त्याच्यासह साथीदारांवर मोक्का लावण्यासाठीही प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे पाठविण्यात आला आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमविर शाहूपुरी पोलिसांनी त्याला एक वर्षासाठी हद्दपार करावे, असा प्रस्ताव गडहिंग्लज विभागाचे पोलीस उपअधीक्षक सागर पाटील यांच्याकडे पाठविला होता. चौकशीनंतर प्रस्ताव पोलीस अधीक्षक डॉ. शर्मा यांच्याकडे पाठविला होता. त्यानुसार हे आदेश करण्यात आले. हद्दपारीच्या आदेशाच्या नोटिसा तत्काळ गुंड तहसीलदारसह त्याच्या साथीदारांना पोहोच करण्याचे आदेशही यावेळी शाहूपुरी पोलिसांना देण्यात आले. (प्रतिनिधी)हद्दपार गुंडांची नावे अशी ‘एसटी’ गँगचा म्होरक्या गुंड स्वप्निल संजय तहसीलदार, संजय ऊर्फ माया महावीर किरनगे, रामचंद्र विलास सावरे, राकेश किरण कारंडे, विठ्ठल काशिनाथ सुतार, तुषार शिवाजी डवरी.
स्वप्निल तहसीलदारसह ‘एसटी गँग’ हद्दपार
By admin | Updated: November 8, 2015 00:35 IST