हुपरी बातमी
हुपरी: हुपरी (ता. हातकणंगले) शहरामध्ये विविध प्रकारच्या शासकीय अनुदानातून २०२०-२१ या वर्षात नगरपरिषदेच्या माध्यमातून ९ कोटी ३५ लाख रुपयांची विविध नागरी विकास कामे राबविण्यात आली आहेत. शहरातील विविध भागांत राबविण्यात आलेल्या या विकासकामांच्या जमा खर्च अहवालास आणि नगरपरिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांना शासन निर्णयानुसार ५,७०५ रुपये विशेष भत्ता देण्याच्या निर्णयास शुक्रवारी सर्वसाधारण सभेत सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. तसेच १५ व्या वित्त अनुदानामधून प्राप्त झालेल्या १५ लाख रुपयांच्या कामांनाही यावेळी मंजुरी देण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा जयश्री महावीर गाट होत्या.
हुपरी नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने पार पडली. या सभेत सर्व २० सदस्यांनी सहभाग घेऊन शहराच्या समस्या व अडचणी मांडल्या. यावेळी विविध सात विषयांवर सुमारे अडीच तास सविस्तर चर्चा करण्यात आली. सभेची विषय पत्रिका व मागील सभेचे इतिवृत्त वाचन सभा अधीक्षक रामचंद्र मुधाळे यांनी केले.
१५ वा वित्त आयोग अंतर्गत कामांची निवड करणे, नगरपरिषद फंडातून शहरात विविध विकास कामे उभारणे, नगर परिषदेकडील समावेशन न झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना शासन निर्णयानुसार वाढीव विशेष भत्ता लागू करणे. आदी सर्व विषयांना यावेळी एकमताने मंजुरी देण्यात आली. तत्कालीन ग्रामपंचायत कालीन ५० कर्मचाऱ्यांचे शासनाने अद्याप समावेशन करून घेतलेले नाही. त्यांना अजूनही ग्रामपंचायत नियमाप्रमाणेच वेतन अदा करावे लागत होते. काम नगर परिषदेचे व वेतन ग्रामपंचायतीचे अशी स्थिती या कर्मचाऱ्यांची होती. त्यामुळे नगर परिषदेच्या वतीने अशा सर्व कर्मचाऱ्यांना शासन निर्णयानुसार ५७०५ रुपये विशेष भत्ता देण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला. नगरपरिषद फंडातून जलकुंभाचा पंप दुरुस्ती करणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, शाहूनगर येथील वाचनालय दुरुस्ती करणे, आरसीसी गटर्स व आरसीसी रस्ता करणे या कामांनाही मंजुरी देण्यात आली. तसेच कुंभार मळा येथील सोमेश्वर मंदिर परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसवणे या कामाचे वाढीव टेंडर काढण्याबाबत चर्चा करण्यात आली.