कोल्हापूर : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल शनिवारी जाहीर झाला असून, यंदाही महाराष्ट्राचा दबदबा कायम राहिला आहे. सुमारे शंभर जणांनी या परीक्षेत यश मिळविले आहे. दक्षिण महाराष्ट्रातील आठजणांनी या परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. या मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील दोघे, सांगली जिल्ह्यातील दोघे व सातारा जिल्ह्यातील चौघांचा समावेश आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कूर (ता. भुदरगड) येथील कुलदीप शिवाजी कुंभार यांनी या परीक्षेत ८६७ वे स्थान पटकावले. ते शेतकऱ्याचे सुपुत्र आहेत, तर सरूडचा अजित बाळासो कुंभार २९२ क्रमांकाने या परीक्षेत यशस्वी झाला आहे. या दोघांच्या यशाने भुदरगड आणि शाहूवाडी परिसरामध्ये चैतन्याचे वातावरण आहे. कारदग्याचा अभिजित शेवाळे ९० वा कोल्हापूर येथील भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्रातील राहुल काशीनाथ कर्डिले आणि प्रशांत बाळासाहेब गांधले यांनी अनुक्रमे ४२२ व ७८१ वे स्थान पटकावले. राहुल कर्डिले हे सध्या दुय्यम उपनिबंधक - वर्ग १ या पदावर कार्यरत आहेत; तर प्रशांत बाळासाहेब गांधले हे गटविकास अधिकारी वर्ग - २ या पदावर कार्यरत आहेत. बेळगाव जिल्ह्यातील कारदगा येथील अभिजित शेवाळे यांनी ९० वे स्थान पटकावले आहे. शेवाळे सध्या नागपूर येथे सहायक आयकर आयुक्त पदावर काम करीत आहेत. सांगली : इस्लामपुरातील सुमित सुनील गरुड आणि शिराळ्यातील प्रवीण सुरेश नलवडे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सांगली जिल्ह्याचा झेंडा फडकावला. सुमित गरुडने नागरी सेवा परीक्षेत देशात १६९ वा क्रमांक, तर प्रवीण नलवडे याने देशात ६४९ वा क्रमांक मिळवला. सुमितची भारतीय पोलीस सेवेसाठी निवड झाली आहे. इस्लामपूरच्या महादेवनगर परिसरातील सुमित शहरातून देशपातळीवरील परीक्षेत यश मिळवणारा पहिला विद्यार्थी ठरला. शिराळा येथील प्रवीण नलवडे याचे वडील डॉ. सुरेश नलवडे यांचा शिराळा बसस्थानक परिसरात वैद्यकीय व्यवसाय आहे. दुष्काळी मातीत ‘माणिक-मोती’ सातारा : ‘माण म्हणजे बुद्धिवंतांची खाण’ म्हटलं जाते, हे शनिवारी पुन्हा अधोरेखित झाले आहे. माण तालुक्यातील वडगाव येथील डॉ. सचिन ओंबासे याने गुणवत्ता यादीत १६४ वा, फलटण तालुक्यातील सुरवडी येथील तुषार मोहिते याने गुणवत्ता यादीत ४७०, तर वीरकरवाडी (ता. माण) येथील विक्रम वीरकर याने गुणवत्ता यादीत ८९२ वा तर शिंगणापूर येथील प्रसाद सुभाष मेनकुदळे याने १,०८५ वा क्रमांक मिळविला आहे. त्यांच्या यशाची बातमी समजताच सर्वांच्या गावात फटाक्यांची आतषबाजी करीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
दक्षिण महाराष्ट्राचा‘यूपीएससी’त झेंडा!
By admin | Updated: July 5, 2015 01:21 IST