सातारा : रिमझिम पावसाची मजा, दाट धुके, खाचखळग्यांचे डोंगरदऱ्यातील रस्ते, वेडीवाकडी वळणे असलेले घाट अन् भोवताली हिरवा निसर्ग अशा १८० किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर रम्य वातावरणात दुचाकी आणि चारचाकीस्वारांनी मान्सून मॅडनेस रॅलीचा थरार अनुभवला. रविवारी सकाळी साडेनऊ वाजता शिवतीर्थावरील शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून रॅलीस सुरुवात झाली. या रॅलीचा शुभारंभ झेंडा दाखवून खासदार उदयनराजे भोसले यांनी केला. यावेळी संकेत शानभाग, ज्येष्ठ क्रीडामार्गदर्शक रमेश शानभाग, सुधाकर शानभाग, शिरीश चिटणीस, रमेश हलगेकर, अॅड. दत्ता बनकर, मकानदार मिस्त्री, राहुल घायताडे, निशांत गवळी, बाळासाहेब ठक्कर, किरण गेंगजे, डॉ. चंद्रशेखर घोरपडे, शैलेश बिडवाई, पप्पू जाधव, संतोष सानप, अॅड. कमलेश पिसाळ, डॉ. पल्लवी पिसाळ, दीपक पाटील, हाफीज शेख, समीर मकानदार आदी उपस्थित होते. यंदा रॅलीसाठी नवीन मार्ग ठेवण्यात आला होता. ही रॅली सातारा- पोवई नाका येथून सुरु होऊन राजपथावरुन मोतीचौक मार्गे राजवाडा, बोगदा, शेंद्रे, वळसे, नागठाणे मार्गे-उंब्रज, पाटण, पाचगणी जंगल, परत पाटण, उंब्रज व पुन्हा परत सातारा असा एकूण अंदाजे १८० किलोमीटरचा प्रवास दुचाकी व चारचाकीस्वारांनी पूर्ण केला. खासदार उदयनराजेंनीही या रॅलीत चारचाकी जीप चालवत सहभागी झाल्याने शेकडो स्पर्धकांचा उत्साह द्विगुणीत झाला. हिरवाईने नटलेला भोवताल, पवनऊर्जा प्रकल्पाचा अनोखा देखावा, कोकण पर्यटनाचा आस्वाद देणारा सातारा जिल्ह्याचा पश्चिम घाट परिसर, जंगल, डोंगरकपारीतून वाऱ्याच्या झोतामुळे पुन्हा आकाशात उलटे उडणारे छोटे झरे, धबधब्यांची विहंगम दृश्ये असे अनुपम निसर्गसौंदर्य डोळ्यांत साठवत स्पर्धकांनी रॅलीचा आनंद घेतला. रॅलीत कोणतीही आपत्कालीन घटना घडू नये यासाठी रेस्क्यू सेवा पथक तसेच रुग्णवाहिकेची सोय करण्यात आली होती. शहरातील वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी वाहतूक पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. (प्रतिनिधी) पश्मिच बंगाल, गोवा, दिल्लीचेही स्पर्धक तब्बल १३०० हून अधिक जण या मान्सून मॅडनेस रॅलीत सहभागी झाले होते. साताऱ्यासह पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर, सांगली, कराड, गोवा, अहमदनगर, तसेच परराज्यातून दिल्ली, पश्चिम बंगाल येथीलही उत्साही स्पर्धक सहभागी झाले होते.
डोंगरदऱ्यात घुमला गाड्यांचा आवाज ! मान्सून मॅडनेस रॅली
By admin | Updated: August 17, 2014 22:32 IST