दत्तात्रय पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
म्हाकवे : यावर्षी सतत पडणारा पाऊस, कोरोना यासह अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत केवळ वर्षभरातच हे मंदिर पूर्णत्वाकडे नेण्याचे मोठे आव्हान पेलून नौका समुद्रापार करण्यात सोनगेकरांना यश मिळाले.
कोकणापासून कर्नाटकपर्यंत या मंदिराची प्रचिती आहे. हे मंदिर दगड व मातीने बांधलेले होते. गतवर्षी आलेल्या महापुरात भिंती कमकुवत झाल्या होत्या. त्यामुळे शासकीय निधी मिळविण्याच्या मागे न लागता गावकऱ्यांनीच लोकवर्गणी व श्रमदानाची तयारी दाखवत मंदिराच्या जीर्णोध्दारासाठी कंबर कसली. गटतटाचा लवलेश, जात ना पंथ, श्रीमंत ना गरीब सर्व चपला बाहेर ठेवून येथील आबालवृद्ध झपाटल्याप्रमाणे कामाला लागले. केवळ दहा महिन्यांतच त्यांनी ग्रामदैवत श्री चौंडेश्वरी देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. स्वकमाईतील निधी आणि श्रध्देपोटी तन, मन, धनाने अर्पित होऊन राबणाऱ्या हजारो हातांमुळे तालुक्यात या मंदिराची नयनमनोहर अशी देखणी वास्तू उभी राहिली. दरम्यान, लाॅकडाऊन असतानाही प्रशासनाचे नियम पाळत सर्वांनीच योगदान दिले. त्यामुळे ४८ बाय ५८ लांबीचे मंदिर आकारास आले. यामध्ये गावातील सर्व संस्था, तरुण मंडळाचे कार्यकर्ते व युवकांचे फार मोठे योगदान आहे. मंदिर कमिटीसह सर्वच गावकरी एकसंघपणे राबल्यामुळे फार मोठे शिवधनुष्य पेलता आले.
..............
२५ म्हाकवे
चौंडेश्वरी देवीच्या मंदिरावरील पंचधातूपासून बनविलेला १४ किलोचा कलश.