बांबवडे सोनवडे (ता. शाहूवाडी) : येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अपक्षांच्या अर्जांमुळे बिनविरोध निवडीला खो बसणार असून, सर्व पॅनल प्रमुखांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावून शासनाच्या २५ लाखांच्या बक्षिसासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
सोनवडे ग्रामपंचायतीची नऊ सदस्य संख्या असून, त्यापैकी, संजीवनी अनिल पाटील, डॉ. बाबासो आनंदा वाघमारे व संगीता शंकर सुतार हे तीन सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित सहा जागांसाठी १७ अर्ज शिल्लक राहिल्याने बिनविरोधच्या प्रयत्नांना खो बसला आहे. गावपातळीवरील सत्ता संघर्ष टाळण्यासाठी राष्ट्रवादी-शिवसेना व जनसुराज्य-काँग्रेसच्या आघाडी प्रमुखांनी समझोता करून निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केले. त्यामध्ये त्यांना यशही आले. परंतु, अपक्षांनी जादा अर्ज भरल्याने बिनविरोधच्या प्रयत्नांना खो बसला आहे. तरीही अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत नेत्यांकडून ग्रामपंचायत बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. आपल्या प्रयत्नांमुळे ग्रामपंचायत बिनविरोध होईल, अशी त्यांना आशा आहे.