मुरगूड : सोनाळी (ता. कागल) येथील वरद रवींद्र पाटील या बालकाच्या खून प्रकरणातील संशयित आरोपी मारुती ऊर्फ महादेव तुकाराम वैद्य याला तत्काळ फाशी झाली पाहिजे. यासाठी आरोपीचे वकीलपत्र कोणीही स्वीकारू नये, अशी मागणी कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली आहे. शिवाय मुरगूड पोलिसांनी या खुनाचा तपास जलदगतीने केल्याबद्दल त्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
यावेळी तालुका अध्यक्ष विकास पाटील यांनी, वरद रवींद्र पाटील या बालकाचा स्वतःला मूल होत नाही म्हणून खून करणाऱ्या मारुती वैद्य या नराधमास फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी केली. पुरोगामी राज्यात व छत्रपती शाहू महाराजांचा जन्मभूमीत क्रौर्याची सीमा गाठणाऱ्या या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस या घटनेचा जाहीर निषेध करीत असल्याचे सांगितले.
निवेदन देतेवेळी दिग्विजय प्रवीणसिंह पाटील, शहर अध्यक्ष रणजित सूर्यवंशी पाटील, नगरसेवक रविराज परीट, माजी सरपंच देवानंद पाटील, राजू आमते, भडगावचे उपसरपंच बी. एम. पाटील, विशाल चौगुले, धनाजी पाटील, रणजित मगदूम , राजेंद्र पाटील, दौलतवाडीचे सरपंच विठ्ठल जाधव, सर्जेराव कानडे, प्रकाश भिउंगडे, संदीप जाधव, रघुनाथ अस्वले आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय मानव अधिकार सेवा सुरक्षा संघतर्फेही निवेदन देण्यात आले. यावेळी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष डॉक्टर शामराव केळुसकर, जिल्हाप्रमुख ओंकार पोतदार, तालुका अध्यक्ष गजानन वागवेकर, कागल तालुका संपर्कप्रमुख सुनील भोई, तालुकाध्यक्ष रमेश फराकटे आदी उपस्थित होते. याशिवाय शिवसेनेनेही आरोपीला फाशी द्या, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
स्वतंत्र एस.आय.टी नेमण्याची मागणी
वरद पाटील याचा खून हा नरबळीच आहे, यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी गृह उपअधीक्षक पद्मा कदम यांना भेटून निवेदन दिले. जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. अरुण शिंदे , जिल्हा प्रधान सचिव हर्षल जाधव यांनी पुढील तपास करण्यासाठी स्वतंत्र एस.आय.टी. नेमण्यात यावी, अशी मागणी केली. यावेळी राजवैभव शोभा रामचंद्र, निशांत सुनंदा विश्वास, स्वाती कृष्णात उपस्थित होते.
फोटो ओळ :- वरद पाटील याचा खून करणारा आरोपी मारुती ऊर्फ दत्तात्रय वैद्य याचे वकीलपत्र कोणीही घेऊ नये, तसेच त्याला फास्ट ट्रॅक कोर्टात लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष विकास पाटील, दिग्विजय पाटील, रणजित सूर्यवंशी, बी. एम. पाटील आदी.