कागल : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप करणारे किरीट सोमय्या स्टंटबाजीसाठीच सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. कारखान्याकडे जाताना सोमय्या यांनी आमचा पाहुणचार घेऊनच पुढे जावे. हिंमत असेल तर गोरगरीब जनतेच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असे आव्हान शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दिले आहे.
मंत्री मुश्रीफ हे रविवारी कागलमध्ये येणार होते. पण तेही सोमवारी येणार असल्याने रविवारऐवजी सोमवारी एकत्र जमण्याचा निर्णय घेतला असून, त्याची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी जि. प. सदस्य युवराज पाटील, भैय्या माने, सूर्यकांत पाटील, प्रवीणसिंह भोसले, चंद्रकांत गवळी, मनोज फराकटे, उपनगराध्यक्ष विवेक लोटे, रमेश माळी, प्रकाश गाडेकर, प्रवीण काळबर, शशिकांत खोत आदी मान्यवर उपस्थित होते. स्वागत विकास पाटील यांनी, तर आभार सभापती रमेश तोडकर यांनी मानले.
स्टंटबाजी हा सोमय्यांचा धंदा
प्रवीणसिंह भोसले म्हणाले की, बिनबुडाचे व सनसनाटी आरोप करून स्टंटबाजी करायची, हा सोमय्या यांचा धंदाच आहे. आता त्यांचा हा शेवटचा स्टंट ठरेल. कारण त्यांनी कोल्हापूरच्या हसन मुश्रीफ या रांगड्या पैलवानाशी पंगा घेतलेला आहे. कधी धोबीपछाड मिळाली, हे कळणारदेखील नाही.
सोमय्यांचे कोल्हापुरी स्वागत होईल
माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर म्हणाले, योद्धा हरत नसला की त्याला बदनाम करण्याचे षड्यंत्र रचले जाते. मंत्र मुश्रीफ यांच्यावर रचलेले हे षड्यंत्र गोरगरीब जनताच मोडून काढेल. किरीट सोमय्यांचे कोल्हापुरी पद्धतीने स्वागत होईल.