पट्टणकोडोली : जागतिक मंदीचा फटका पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील लहान-मोठ्या फौंड्री उद्योगांना बसत आहे. कंपनीतील उत्पादन कमी होत असल्याने कामगारांच्या हाताला काम मिळेनासे झाले आहे. त्यामुळे पट्टणकोडोली परिसरातील अनेक कामगारांना आठवड्यातून चार ते पाच दिवसच काम मिळत असल्याने त्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे, तर १०० हून अधिक लहान फौंड्री उद्योगांसमोर उत्पादनाला मागणी मिळविण्यासाठी वाट पाहण्याची वेळ आली आहे.पट्टणकोडोलीसह परिसरामधील लोक पारंपरिक चांदी व्यवसायावर आपला उदरनिर्वाह करत होते. गेल्या काही वर्षांपासून चांदीच्या दरामध्ये होणाऱ्या चढ-उतारामुळे व्यवसाय अडचणीत येऊन हजारो कामगार बेरोजगार झाले आहेत. मात्र, कागल-हातकणंगले येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील कंपन्या या कामगारांना रोजगार मिळविण्यासाठी उपयुक्त ठरल्या. वसाहतीमध्ये अनेक प्रकारचे कारखाने उभे राहिले. या औद्योगिक वसाहतींमध्ये सुमारे २00 हून अधिक फौंड्री कंपन्या स्थापन झाल्या. या कंपन्यांमध्ये परिसरातील अनेक कामगारांना रोजगार मिळाला. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून जागतिक मंदीचा फटका या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. मुळातच हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्याच फौंड्री कंपन्या मोठ्या आहेत. बाकी सर्वच लहानसहान प्रमाणात उत्पादन घेणाऱ्या आहेत. याच कंपन्यांमध्ये कामगारांची संख्याही मोठी आहे. मंदीमुळे कंपन्यांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. कमी उत्पादनासाठी जादा कामगार असल्याने आठवड्यातून चार ते पाच दिवसच कारखाने सुरू आहेत. त्यामुळे कामगारांचे कामाचे दिवस कमी भरू लागल्यामुळे त्यांना मिळणारा मोबदलाही कमी प्रमाणात मिळत असल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न आवासून उभा आहे. फौंड्री कंपन्यांसमोर उत्पादन, तर कामगारांसमोर आर्थिक संकटाबरोबरच बेरोजगारीचाही प्रश्न उभा राहिला आहे. (वार्ताहर)अडचण : लहान उद्योगांचीकागल - हातकणंगले पंचतारांकित एमआयडीसीत अनेक फौंड्री कंपन्या आहेत. मागणी कमी झाल्याने त्यांचे उत्पादन कमी झाले असून, त्याचा फटका येथील लहान कंपन्यांना बसत आहे. यातील कामगारांना कामासाठी वाट पहात बसावी लागते.
मंदीचा फौंड्री उद्योगाला फटका
By admin | Updated: December 23, 2015 01:25 IST