नागरिकांत घबराट : पुण्याला तपासणीसाठी आज पाठविणार कोल्हापूर : ताराबाई पार्कातील वारणा कॉलनीत कवटी, हाडे अर्धवट जळालेल्या स्थितीत मिळून आल्याने शुक्रवारी सकाळी नागरिकांमध्ये एकाच घबराट निर्माण झाली. हा प्रकार समजताच शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. प्रथमदर्शनी ही अज्ञात मानवसदृश कवटी व हाडे असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. ही कवटी व हाडे तपासणीसाठी पुणे येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे आज, शनिवारी पाठविण्यात येणार आहेत. याबाबत पोलिसांनी सांगितले की, ताराबाई पार्कातील मेरी वेदर मैदानावर गुरुवारी सकाळी मुले खेळत होती. त्यावेळी त्यांचा चेंडू वारणा कॉलनीतील वारणा वर्ग तीन अ, तीन टीए इमारतीच्या पिछाडीस आला. हा चेंडू घेण्यासाठी एक मुलगा तिथे गेला असता त्याला कवटी व हाडांचे अवशेष दिसून आले. हे पाहून घाबरून चेंडू घेऊन तो मुलगा तेथून बाहेर आला. त्याने हा प्रकार मैदानावरील मित्रांना सांगितला. त्यांनी हा प्रकार शाहूपुरी पोलीस ठाण्यास कळविला. त्यानुसार पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी व पोलीसांचा ताफा घटनास्थळी आला. पोलिसांनी पाहिले असता त्या ठिकाणी जळालेल्या स्थितीत कवटी व हाडे दिसून आली. एखाद्या वेळी प्राणी किंवा माकडाची ही कवटी व हाडे असावीत किंवा वैद्यकीय अभ्यासासाठी एखाद्या विद्यार्थ्याने मानवी अवशेषांचा वापर केला असेल व अभ्यासानंतर ही हाडे व कवटी टाकली असण्याची शक्यता आहे. घटनास्थळी पंचनामा करून हाडे व कवटी घेऊन ती पोलीस ठाण्यात आणली. ‘अज्ञात मानवसदृश कवटी व हाडे अर्धवट जळालेल्या स्थितीत (स्त्री किंवा पुरुष सांगता येत नाही) वारणा कॉलनी येथे मिळून आली,’ अशी पोलीस दप्तरी नोंद केली. यावेळी शहर पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे यांनी घटनास्थळी पाहणी केली.दरम्यान, वारणा कॉलनीत येण्यासाठी चारही बाजूंना संरक्षक भिंती असून त्यांतील काही निखळलेल्या स्थितीत आहेत. त्यामुळे दिवसासुद्धा या ठिकाणी नीरव शांतता असते. त्यामुळे हा प्रकार बाहेर करून येथे कवटी व हाडे आणून टाकल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
वारणा कॉलनीत आढळली कवटी, हाडे
By admin | Updated: February 27, 2016 01:40 IST