सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले काही दिवस शाळा फोडत असलेली टोळी जेरबंद करण्यात सिंधुदुर्ग पोलिसांना यश आले आहे. आज, गुरुवारी सायंकाळी उशिरापर्यंत स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग व सावंतवाडी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत शिवानंद इंगळे याच्यासह अन्य पाच आरोपींना ताब्यात घेतले आहेत. हे सर्व आरोपी बेळगाव येथील असून, त्यांच्याकडून पोलिसांनी ९६ देवळातील घंटा, चोरीसाठी लागणारे सामान, तसेच शाळेतील चीजवस्तूही जप्त केल्या आहेत. मात्र, नावे गुप्त ठेवण्यात आली आहेत. चोरांची टोळी पकडली याला जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला. मात्र, अधिक माहिती देण्याचे टाळले. याच अनुषंगाने शुक्रवारी सकाळी ास्कर यांची सावंतवाडी पोलीस ठाण्यात पत्रकार परिषद होणार आहे.याबाबत माहिती अशी की, शिवानंद इंगळे हा युवक आंबोली घाटातून बेळगावच्या दिशेने सायकलीने जात होता. त्यावेळी त्याने विश्रांती म्हणून आंबोलीतील पोलीस ठाण्यानजीकच्या देवळात गेला आणि तेथे कोणी नाही, हे बघून तेथील घंटा चोरली. याचवेळी आंबोलीतील ग्रामस्थ आनंद कर्पे हे तेथे पोचले आणि हा सर्व प्रकार बघितला आणि पोलिसांनी सांगितला. त्यानंतर आंबोलीचे पोलीस कॉन्स्टेबल संजय खाडे यांनी इंगळे याच्या सायकलच्या पिशवीची झाडाझडती घेतली. यात पाण्याच्या रिकाम्या बाटल्या आणि त्याच्याखाली देवळातील ९६ घंटा आढळून आल्या तसेच त्याच्या पिशवीच्या झाडाझडतीत लहान हातोडी, फुटका टोप, शाळेतील चीजवस्तू यासह अन्य सामानही सापडले आहे.शिवानंद इंगळे याला आंबोली पोलिसांनी ताब्यात घेत सावंतवाडीत आणले. त्यावेळी त्याने शाळा फोडी तसेच जिल्ह्यातील अन्य गुन्ह्यांची कबुली दिली असून या टोळीत बेळगाव येथील आठजणांचा समावेश आहे. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग व सावंतवाडी पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करीत बेळगाव येथे जात रात्री उशिरापर्यंत सहाजण ताब्यात घेतले असून अन्य दोघे जण पळून जाण्यात यशस्वी ठरले आहेत. पोलीस या घटनेबाबत शुक्रवारी विस्तृतपणे माहिती देणार आहेत. या टोळीला ताब्यात घेतल्याने जिल्ह्यातील अनेक गुन्हे उघडकीस येणार आहेत. आंबोली व सावंतवाडी पोलिसांचे हे यश मानले जात असून पंधरा दिवसातील ही तिसरी महत्त्वाची कारवाई आहे. (प्रतिनिधी))
शाळा फोडणाऱ्या सहाजणांच्या टोळीला अटक
By admin | Updated: November 28, 2014 00:03 IST