भीमगोंडा देसाई --कोल्हापूर पन्हाळा तालुक्यातील पाणलोट विकास योजनेतील हरियाली कार्यक्रमातील घोटाळाप्रकरणी कर्तव्यात कसूर, अनियमितता, शासकीय निधीचा योग्य विनियोग न करणे, असा ठपका असलेल्या सहा ग्रामसेवकांची खातेनिहाय चौकशी प्रस्तावित केली आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने या प्रकरणात सहा तत्कालीन अधिकाऱ्यांना नोटीस दिली आहे. त्यामुळे या कामात ‘ढपला’ मारलेले हादरून गेले आहेत.केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या पाणलोट विकास योजनेंतर्गत हरियाली कार्यक्रम सन २००७ ते २०११ या कालावधीत राबविण्यात आला. वनक्षेत्र अधिक असल्यामुळे पन्हाळा तालुक्याची या योजनेसाठी निवड करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेने हरियाली अंतर्गत विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी केली. तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देणे, आराखडा तयार करणे हे काम ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून सामाजिक वनीकरण, कृषी विभाग यांच्याकडून करून घेतले. वाघुर्डे, पणोरे, वेतवडे, वेलवडे, ग्रोगवे, आकुर्डे, सुळे, कांदवडे, पणोरे, आंबर्डे, हरपवडे, निवाचीवाडी, आदी गावांत ही योजना राबविण्यात आली.वनीकरण वाढविणे, गांडूळ खत तयार करणे, रोप निर्मिती करणे, रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करणे, डोंगराळ जमिनीवर उपचार करणे, आदी कामांसाठी योजनेतून पावणेदोन कोटी मंजूर झाले. मात्र, प्रत्यक्षात कामात अनियमितता केली. रोपे चोरीला आणि जळून गेली आहेत. जमिनीत पैसे मुरविल्याचे दाखवून ढपला मारला. त्यामुळे शासनाचा मुख्य उद्देश सफल झाला नाही. म्हणून हरियाली घोटाळ्यासंबंधी पावसाळी अधिवेशनात लक्ष्यवेधी उपस्थित झाली. त्यानंतर ग्रामीण विकास यंत्रणा हडबडून जागी झाली. चौकशी झाली. सुरुवातीला या प्रकरणात योजनेच्या कालावधीत असलेल्या सर्व १३ ग्रामसेवकांना खातेनिहाय चौकशीची नोटीस देण्यात आली; पण नंतर अतिरिक्त कार्यभार किंवा योजना कालावधीत प्रशासकीय कामकाज न केलेले ग्रामसेवक यामध्ये असल्याचे पुढे आले. त्यामुळे सात ग्रामसेवकांना यातून वगळले आहे. उर्वरीत सहा ग्रामसेवक दोषी असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे त्यांची खातेनिहाय चौकशी करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.हे आहेत ग्रामसेवकखातेनिहाय चौकशीसाठी प्रस्तावित सहा ग्रामसेवक व त्यावेळची ग्रामपंचायत कंसात असे : जे. बी. बिडकर (बीडकर आकुर्डे, आंबर्डे, हरपवडे, निवाचीवाडी, पणुत्रे), एस. एम. पाटील (पणोरे), टी. बी. पाटील (सुळे, कांदवडे), ए. बी. देसाई (आकुर्डे), वाय. एस. पाटील (पणोरे, वेलवडे), एस. बी. पाटील (वाघर्डे) अशा सहा ग्रामसेवकांची खातेनिहाय चौकशी होणार आहे. संबंधित ग्रामपंचायतींमध्ये काम करताना रोपे नष्ट होणे, रोपांची निगा राखण्यासंबंधी दक्षता न घेणे, उशिरा पोलिसांत गुन्हा दाखल करणे, पणोरे ग्रामपंचायत हद्दीतील सामूहिक खासगी क्षेत्रातील रोपे नष्ट होणे, रोपांची निगा राखण्याची दक्षता घेतली नाही, पशुधन मेळाव्यात औषधांचा विनियोग केलेला नाही, असे आरोप या सहाजणांनी अंशत: मान्य केले आहेत. हरियाली कामातील अनियमितता प्रकरणी पहिल्यांदा १३ ग्रामसेवकांना खातेनिहाय चौकशीसाठी नोटीस दिली होती; पण कागदोपत्री माहिती घेतल्यांनतर यातील सातजण दोषी नसल्याचे पुढे आले. त्यामुळे उर्वरित सहाजणांची खातेनिहाय चौकशी प्रस्तावित केली आहे. - एम. एस. घुलेउपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत)सातजणांना वगळले...पहिल्या टप्प्यात ठपका ठेवलेले ग्रामसेवक वैशाली पाटील (पणुत्रे), एस. डी. दाभाडे (सुळे), पी. एम. चोपडे (वाघुर्डे), वर्षा घस्ती, एम. के. शिंगाडे (आकुर्डे), एस. एम. पाटोळे (हरपवडे, निवाचीवाडी), ए. बी. मुजावर (वेलवडे, ग्रोगवे) यांना खातेनिहाय चौकशीच्या कारवाईतून वगळले आहे. योजना अंमलबजावणी कालावधीत त्यांनी प्रशासकीय कामकाज न केल्याने त्यांना वगळले आहे.
सहा ग्रामसेवकांची खातेनिहाय चौकशी
By admin | Updated: November 21, 2015 00:40 IST