हसन मुश्रीफ यांची ग्वाही : संभाजी ब्रिगेडतर्फे नागरी सत्कार कोल्हापूर : जिजाऊंचे जन्मस्थळ असलेल्या सिंदखेडराजा या गावची दुर्दशा पाहिल्यानंतर मला अतीव दु:ख वाटले. बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून या स्थानाचा विकास करण्याची प्रतिज्ञा घेतली आणि २५० कोटींचा निधी मंजूर करून घेतला. विधानसभा निवडणुकीनंतर आघाडीचीच सत्ता राहिली, तर येत्या दोन वर्षांत हे शहर जिजाऊमय करीन, अशी ग्वाही जलसंपदामंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. संभाजी ब्रिगेडच्यावतीने शाहू स्मारक भवनात आज, शुक्रवारी जिजाऊ जन्मस्थळासाठी निधी मंजूर केल्याबद्दल हसन मुश्रीफ व मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याबद्दल युवराज संभाजीराजे यांच्या सत्काराचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विकासआण्णा पासलकर होते. यावेळी संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष शांताराम कुंजीर, प्रवक्ते श्रीमंत कोकाटे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता विजय घोगरे, नगरसेवक सत्यजित कदम, अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, बाबा महाडिक उपस्थित होते. मुश्रीफ म्हणाले, जागतिक स्मारक व्हावे, यासाठी प्रयत्न केले जात असून, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तातडीने दोन कोटी रुपयेही वर्ग करण्यात आले आहेत. संभाजीराजे म्हणाले, शिवाजी महाराजांचा जिवंत इतिहास असलेल्या गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी आघाडी सरकारने मदत करावी. विकासअण्णा पासलकर, श्रीमंत कोकाटे यांनी मनोगत व्यक्त केले. सत्कार नाही; स्वागत...मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यात ५२ संघटनांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. मी फक्त त्यांना जोडण्याचे काम केलो. हे श्रेय माझे एकट्याचे नाही. त्यामुळे मी सत्कार स्वीकारणार नाही, असे सांगून संभाजीराजेंनी सत्काराऐवजी स्वागत स्वीकारले. संघटनेचे प्रतिनिधी म्हणून वसंतराव मुळीक यांनी हा सत्कार स्वीकारला.
सिंदखेडराजा जिजाऊमय बनवू
By admin | Updated: July 26, 2014 00:16 IST