कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांना अटक करण्याच्या मागणीच्या निषेधार्थ जिल्ह्यातील सकल मराठा समाज, छत्रपतीप्रेमी तसेच बहुजन समाजाच्या वतीने मंगळवारी (दि. २४) सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मूक निदर्शने करण्यात येणार आहेत.
मराठा समाजाच्या आरक्षणाबरोबरच अन्य मागण्या सकल मराठा समाजाच्या वतीने केल्या आहेत. खासदार संभाजीराजे यांनी शुक्रवारी नांदेड येथे मराठा समाज समन्वयकांच्या उपस्थितीत मूक आंदोलन केले. त्याला उपस्थित मराठा समाज समूहाने उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला. त्यामुळे गुणरत्न सदावर्ते यांनी व्ही.डी.ओ. क्लिपद्वारे खासदार संभाजीराजे यांच्या अटकेच्या केलेल्या मागणीचे कोल्हापुरात तीव्र पडसाद उमटले. सोशल मीडियावरून अनेकांनी सदावर्ते यांचा निषेध नोंदवला.
दरम्यान, सदावर्ते यांचा निषेध नोंदवण्यासाठी सकल मराठा समाज, छत्रपतीप्रेमी तसेच बहुजन समाजाच्या वतीने मंगळवारी (दि. २४) छत्रपती शिवाजी महाराज चौकात मूक निदर्शने करण्यात येणार असल्याचे मराठा समाज संघटक बाळ घाटगे, मराठा समाज सेवा संघटनेचे चंद्रकांत पाटील, अ. भा. छावा युवक संघटनेचे राजू सावंत, राजमात जिजाऊ ब्रिगेडच्या सुनीता पाटील, संभाजी ब्रिगेडचे रूपेश पाटील, मराठा क्रांती ठोक मोर्चाचे हणमंत पाटील, मराठा शौर्यपीठाचे प्रसाद जाधव, लोकसेवा राजर्षी शाहू प्रतिष्ठानचे बाबा महाडीक, रूपेश पाटील, चंद्रकांत सूर्यवंशी, ॲड. रणजित गावडे, दादासाहेब लाड, रमेश मोरे, अशोक पोवार आदींनी जाहीर केले आहे.