कोल्हापूर: बाजार समितीत वारणी, भरणी कोणी द्यायची यावरुन व्यापारी व वाहतूकदारांच्या मध्ये सुरु झालेला तिढा गुरुवारी देखील कायम राहिला. दरम्यान शुक्रवारी पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी यासंदर्भात बैठकीचे नियोजन केल्याने आज तिढा सुटण्याची चिन्हे आहेत.
वर्षभरापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत ज्यांचा माल त्यांचा हमाल या झालेल्या निर्णयानुसार व्यापाऱ्यांनी वागावे असे सांगत लॉरी ऑपरेटर असोसिएशनच्या नेतृत्वाखाली वाहतूकदारांनी बाजार समितीत माल भरण्यास नकार दिला आहे. बाजार समिती प्रशासनाने मध्यस्थी केली तरी गेल्या आठ दिवसापासून हा तिढा सुटू शकलेला नाही. वाहतूकदार माल उचलत नसल्याने बाजार समितीत दोन हजार क्विंटल कांदा पडून आहे. गुरुवारी देखील यासंदर्भात लॉरी ऑपरेटर असोसिएशन पत्र देईल या प्रतीक्षेत समिती प्रशासन होते. काही निर्णय न झाल्याने झालेली ८१० पोती कांद्याची आवक देखील आडत दुकानी तशीच पडून राहिली.
मालाची वाहतूक थांबली असलीतरी स्थानिक पातळीवरील कांदा उठाव व वाहतुकीवर काहीही परिणाम झालेला नाही. त्यामुळे दर आणि आवक टिकून आहे. फक्त बड्या व्यापाऱ्यांकडे कांदा शिल्लक राहत आहे. यावर उपाय म्हणून त्यांनी बाजार समितीकडे पोलीस बंदोबस्तात वाहतूक सुरु करण्याची परवानगी मागितली होती, पण गुरुवारी त्याबाबत कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत.
चौकट
आवक व दर टिकून
सध्या चाळीतील साठवणुकीचा चांगल्या प्रतीचा कांदा बाजारात आला आहे. गुरुवारी ८१० पोती सौद्याला आली होती. त्याला सरासरी १६०० रुपये क्विंटल असा दर मिळाला आहे.