कोल्हापूर : अंबाबाई मंदिर परिसरातील उत्खनन करण्यात आलेल्या मणिकर्णिका कुंडावर पाच-दहा फूट उंचीची झुडपे आणि गवत उगवले आहे. माउली लॉजसोबत असलेल्या वादामुळे या कुंडाचे जतन संवर्धन रखडले आहे. आता नवरात्रौत्सव आणि मंदिरदेखील सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने यावर मार्ग काढून हे काम पूर्ण करणे गरजेचे आहे.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने दीड वर्षापूर्वी बाबाई मंदिर परिसरातील मणिकर्णिका कुंडाच्या उत्खननाला सुरुवात करण्यात आली. पूर्ण कुंडाचे उत्खनन आता झाले आहे; पण एका बाजूला कुंडाच्या वर दीड फूट पुढेपर्यंत माउली लॉजची इमारत बांधली गेली आहे. वारंवार सांगून, आंदोलने करूनदेखील लॉजच्या मालकांनी हे बांधकाम हटवले नाही. उलट प्रकरण उच्च न्यायालयात नेले. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून स्थिती जैसे थे आहे. बांधकाम हटवल्याशिवाय जतन संवर्धन करता येणार नाही, त्यामुळे या भागात झुडपे व उंच गवत उगवले आहे. ड्रेनेजचे पाणी थांबविले असले तरी अजूनही गळतीमुळे हे पाणी कुंडात मिसळत आहे.
---
इमारत ढासळण्याची भीती
कुंडाच्या अगदी दगडी बांधकामावर या इमारतीचे बांधकाम केले गेले आहे. आता उत्खननामुळे इमारतीच्या बाजूला एक इंचही जागा राहिलेली नाही. बांधकाम काढायला गेले तर इमारत ढासळण्याची भीती आहे.
---
कुंडाच्या भिंतीवर दीड फूट पुढेपर्यंत बांधकाम झाले आहे. ते काढल्याशिवाय कुंडाचे पूर्ण स्ट्रक्चर खुले होणार नाही. कुंडातील पाणी वाढले तर तेथून पाण्याचा निचरा होण्याचा मार्ग आहे. शिवाय दगडी पायऱ्या आहेत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिकेकडून माहिती मागवली आहे. लॉजच्या मालकांना नोटीस काढण्याची सूचना केली आहे.
शिवराज नायकवडी
सचिव
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती कोल्हापूर.
---
फोटो नं २५०९२०२१-कोल-मणिकर्णिका कुंड
ओळ : कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर परिसरातील पौराणिक मणिकर्णिका कुंडाचे काम माउली लॉजच्या बांधकामामुळे रखडले आहे. त्यामुळे या कुंडात आता झुडपे व गवत उगवले असून, परिसर हिरवागार झाला आहे.
---