कोल्हापूर : शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ६ जून रोजी काढण्यात येणारी मिरवणूक हा लोकसोहळा व्हावा, अशी अपेक्षा विविध मान्यवरांनी व्यक्त केली. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने शाहू स्मारक भवन येथे कार्यक्रमाच्या रूपरेषेबाबत बैठक आयोजित केली होती. यावेळी बोलताना मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक म्हणाले, गेली दहा वर्षे शिवराज्याभिषेकानिमित्त ही मिरवणूक काढली जात आहे. याच दिवशी रायगड येथे शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो; पण काही लोकांना तिथे जाता येत नाही. अशा लोकांनी शहरातील या मिरवणुकीत सहभागी व्हावे. या शिस्तबद्ध मिरवणुकीत कोणत्याही प्रकारचे बीभत्स नृत्य असणार नाही. विधायक दृष्टिकोनातून लोकसोहळा व्हावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.मिरवणुकीत सहभागी होणाऱ्यांनी पावित्र्य राखावे. व्यसनी, नशापान करणाऱ्यांना, मावा खाणाऱ्यांना याठिकाणी प्रवेश नसल्याचेही मुळीक यांनी सांगितले. ‘रिपाइं’चे जिल्हाध्यक्ष प्रा. विश्वासराव देशमुख म्हणाले, भव्य-दिव्य मिरवणूक काढायची आहेच; पण त्याबरोबर प्रबोधनात्मक सामाजिक ऐक्य, विकासाच्या फलकांचाही यामध्ये समावेश करावा. मिरवणुकीत टाळ-मृदंगासह दीडशे वारकरी सहभागी होणार असल्याचे जगन्नाथ पाटील यांनी सांगितले. यावेळी संभाजीराव जगदाळे, रामसिंग रजपूत, शैलेजा भोसले, फिरोज उस्ताद, हिंदुराव शेळके, बबन रानगे, अशोक माळी यांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीला भाऊसाहेब काळे, शिवाजीराव हिलगे, किशोर घाटगे यांच्यासह विविध पक्षांतील कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी) 'करबला दंगल'चे आकर्षणशिवाजी महाराज सर्व धर्मीयांचे दैवत आहेत. त्यांच्या राज्याभिषेक दिन मिरवणुकीत मुस्लिम समाज मोठ्या संख्येने सहभागी होणार असून, आमच्यावतीने खास कर्नाटकातून ‘करबला दंगल’ हे नृत्य आणणार असल्याचे मुस्लिम बोर्डिंगचे संचालक साजिद खान यांनी सांगितले.
शिवराज्याभिषेक मिरवणूक ‘लोकसोहळा’ व्हावा
By admin | Updated: May 28, 2015 00:57 IST