कोल्हापूर : शिवलीला व आनंदने लग्नगाठ बांधत आयुष्याच्या नव्या पर्वाला सुरुवात केली. आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत फुलांचा वर्षाव करून नवविवाहित जोडप्याला शुभाशीर्वाद दिले गेले. यानिमित्ताने गारगोटी रोडवरील जैताळ फाटा येथील अवनि संस्थेच्या बालगृहाला मंगल कार्यालयाचे स्वरूप आले होते. अनुराधा भोसले, प्रमिला जरग, डॉ. रेश्मा पवार यांच्यासह सामाजिक, वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आप्तेष्टांनी स्वत:च्या घरातील कार्याप्रमाणे सर्व सूत्रे सांभाळली.
एकटी या संस्थेकडे तीन वर्षांपूर्वी बेघर म्हणून दाखल झालेल्या मूळच्या कर्नाटकातील शिवलीला गोपी या तरुणीचा लग्नसोहळा बुधवारी अवनि संस्थेत सत्यशोधक पध्दतीने पार पडला. कडवे (पाटीलवाडी, ता. शाहुवाडी) येथील आनंदा पांडुरंग पाटील यांनी कुटुंबीय व मान्यवरांच्या उपस्थितीत शिवलीला हिच्यासोबत लग्नगाठ बांधली. यावेळी अक्षता म्हणून फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करण्यात आला. आजुबाजूचे वातावरणही कमालीचे भारावलेले होते. संस्थेतील कर्मचाऱ्यांसह वरपक्षाकडील पाटील कुटुंबियांची विवाहस्थळी बरीच लगबग सुरू होती.
दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी आवर्जून उपस्थित राहून कार्यक्रमाला आणखी वलय प्राप्त करून दिले. त्यांनी स्वत: अक्षता म्हणून फुलांची उधळण केली. त्यांच्यासमवेत रोहित सोनुले, संजय पाटील, डॉ. अमरसिंह रजपूत, डॉ. मंजुळा पिशवीकर यांच्यासह पाटील कुटुंबियांकडून रुक्मिणी पाटील, पांडुरंग पाटील, पूजा पाटील, संदीप पाटील यांनी सहभाग घेतला.
फोटो: २४०३२०२१-कोल-अवनि ०१
फोटो ओळ:
अवनि संस्थेत बुधवारी झालेल्या अनोख्या विवाह सोहळ्यात शिवलीला व आनंद पाटील यांनी आमदार ऋतुराज पाटील, अनुराधा भोसले, अमरसिंह रजपूत, संजय पाटील, रेश्मा पवार, मंजुळा पिशवीकर यांच्या साक्षीने नव्या आयुष्याला सुरुवात केली.