संदीप बावचे -शिरोळ - विधानसभा मतदारसंघात प्रचाराच्या रणधुमाळीने वेग घेतला आहे. राजकीय वातावरण गरमागरम झाले असून, या चौरंगी लढती लक्षवेधी ठरत आहेत. मात्र, पक्षीय पातळीपेक्षा गट पातळीवरील अस्तित्व अबाधित ठेवणारी ही निवडणूक असल्याने प्रचारातील ईर्षा पेटली आहे. गाठीभेटी, पदयात्रा, कोपरासभा यांसह जाहीर सभेत राजकीय नेत्यांच्या टीका होत असून, सध्यातरी या मतदारसंघात सर्व पक्षांना फुटीरतेचे ग्रहण लागले आहे. यामुळे येथे कांटे की टक्कर होणार आहे.शिरोळ तालुका हा कॉँग्रेसचा बालेकिल्ला. मध्यंतरीचा अपवाद वगळता कॉँग्रेस पक्षाचे नेतृत्व या तालुक्यात कायम राहिले आहे. राज्यात महायुती तुटली व आघाडीत बिघाडी झाली, त्यामुळे राजकीय समीकरणे बदलली, अशी पहिलीच घटना घडल्याने पक्षीय पातळीवरील नेत्यांनी आपल्या समर्थक स्थानिक नेत्यांना उमेदवारी देऊन कार्यकर्त्यांची गोची केली आहे. कालपर्यंत हातात हात घालून कॉँग्रेस व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकत्र होते. महायुतीमुळे स्वाभिमानी, शिवसेना, भाजप यांच्यात मनोमिलन झाले होते; पण त्यांच्यात दुफळी झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उभी फूट पडली. तालुका पातळीवरील काही स्थानिक नेतेमंडळींनी पक्षाचे उमेदवार असूनही त्यांचे कार्यकर्ते दिशाहीन झाले असून, सोयीचा उमेदवार निवडून ते प्रचाराला लागले आहेत. तालुक्यात सा. रे. पाटील, राजेंद्र पाटील-यड्रावकर, माने गट, कुंभार गट हे प्रमुख गट कार्यरत असून, त्या खालोखाल अनिल यादव, दिलीप पाटील, अशोकराव माने, विठ्ठलराव नाईक-निंबाळकर यांचे गट आहेत. यातील निवेदिता माने, अनिल यादव, दिलीप पाटील हे आपल्या भूमिकेबाबत अद्याप मौन पाळून आहेत. राष्ट्रवादीचे उमेदवार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत माजी मंत्री जयंत पाटील यांनी शिवसेना, कॉँग्रेस यासह स्वाभिमानी पक्षावर तोफ डागली आहे. विकासाची दृष्टी देणाऱ्या युवा नेतृत्वाला संधी देण्याचे आवाहन त्यांनी केले. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सा. रे. पाटील यांच्या प्रचाराचा नारळ फोडून कॉँग्रेस पक्षाचे धोरण लोकहिताचे आहे, या मुद्द्यावर भर दिला, तर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या तडफदार भाषण शैलीत स्वाभिमानीला लक्ष्य केले. स्वाभिमानीचे उमेदवार सावकर मादनाईक यांचा प्रचार आक्रमकपणे सुरू असून, साखरसम्राटांना जागा दाखवा, असे सांगून कॉँग्रेस-राष्ट्रवादीला ते डिवचत आहेत, तर सेनेचे उमेदवार उल्हास पाटील यांनी एक व्होट, एक नोट हा फार्म्युला राबवीत, स्वाभिमानीने केलेल्या अन्यायाचा पाढा ते गिरवीत आहेत. एकंदरीत प्रचारात आरोप-प्रत्यारोपांच्या तोफा धडाडत असून, जाहीर सभेतील दिग्गज नेत्यांचे व्यक्तव्य काय असणार याची उत्सुकता असल्याने सभांना गर्दी होत आहे. याच गर्दीचे रूपांतर मतात कितपत होते हे निकालानंतरच समजणार आहे. मात्र, सध्यातरी उमेदवार तुल्यबळ असल्याने लक्षवेधी ठरलेली शिरोळची ही निवडणूक ऐतिहासिक ठरेल, असेच संकेत मिळत आहेत.
शिरोळला प्रचाराची ईर्षा शिगेला
By admin | Updated: October 9, 2014 00:19 IST