जयसिंगपूर : साखरेला ३५०० रुपयांपर्यत भाव मिळाला, तरच एकरकमी एफआरपी देणे शक्य होणार आहे. निर्यातीचे धोरण व साखरेला दर मिळवून देण्यासाठी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र शासनाकडे प्रयत्न करावेत. उसाच्या दरासाठी आंदोलन करतात; मग तूरडाळीच्या वाढलेल्या दरासाठी आंदोलन का करीत नाहीत? असा इशाराही खा. शेट्टींना माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी दिला. यावेळी राजेंद्र पाटील-यड्रावकरांना विधानपरिषदेवर निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.जयसिंगपूर येथे शरद साखर कारखाना, नरंदे व कृषी महाविद्यालय, जैनापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या दुसऱ्या शरद कृषी प्रदर्शनाचे उद्द्याटन शुक्रवारी आमदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार पाटील म्हणाले, शरद कारखान्याच्या पुढाकाराने येथील कृषी प्रदर्शनात राज्यातील व देशातील नामवंत संस्थांनी भाग घेतला असून, खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना नवे तंत्रज्ञान अवगत होणार आहे. सध्या शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करीत असून, त्यांनी आणखी नवीन प्रयोगाचे स्वागत करून जगातील ज्ञान घेण्याची गरज आहे.प्रारंभी सहकाररत्न स्व. शामराव पाटील-यड्रावकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कृषी प्रदर्शनाचे उद्द्याटन करण्यात आले. त्यानंतर शरद कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी शरद कारखान्याची निर्मिती झाली असून, त्याबरोबरच सर्व सोयींनीयुक्त शिक्षण संस्था उभारल्या आहेत. तसेच येत्या काही दिवसांत आरोग्य सेवा उपलब्ध करण्यात येणार असून, शेतकऱ्यांना नवनवीन काहीतरी देण्यासाठी हे कृषी प्रदर्शन भरविण्यात आले आहे.यावेळी पक्षप्रतोद संजय पाटील-यड्रावकर, महाराष्ट्र राज्य जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील-बोरगावकर, नगराध्यक्ष सुनील पाटील-मजलेकर, जिल्हा कृषी अधिकारी मोहन आठवले, रावसाहेब भिलवडे, तुकाराम खामकर, धनाजी देसाई, सर्जेराव शिंदे, सागर चौगुले, सत्येंद्रसिंह निंबाळकर, सुजाता शिंदे, जयपाल कुंभोजे, थबा कांबळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
साखरेच्या दरवाढीसाठी शेट्टींनी प्रयत्न करावेत
By admin | Updated: November 21, 2015 00:40 IST