कोल्हापूर : रंकाळा व महापालिकेने ‘ग्रीन झोन’ म्हणून घोषित केलेल्या परताळा परिसरात एका ठेकेदाराकडून मोठ्या प्रमाणात खरमाती टाकल्याचा प्रकार ‘लोकमत’ने गुरुवारी उघडकीस आणला. त्यामुळे हडबडलेल्या यंत्रणेने तत्काळ ठेकेदारास जाब विचारीत खरमाती हटविण्यास भाग पाडले. शुक्रवारी सकाळपासून ठेकेदाराने जेसीबी मशीनच्या साहाय्याने टाकलेली खरमाती पुन्हा उचलून नेली. असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी प्रशासनाने तत्काळ कडक उपाय योजावेत, अशी मागणी रंकाळाप्रेमींतून व्यक्त होत आहे. रंकाळ्याच्या सांडव्याच्या बाजूला एका ठेकेदाराने तब्बल दहा ते बारा डंपर खरमाती आणून टाकली. खरमाती टाकत असताना रंकाळ्याच्या संरक्षणासाठी लावलेले तारेचे कुंपणही तोडून काढले. मोठ्या अवजड वाहनांच्या साहाय्याने थेट रंकाळ्यातच खरमाती टाकल्याचा प्रकार उघडकीस आल्याने रंकाळाप्रेमींतून तीव्र संतापाची प्रतिक्रिया उमटली. थेट रंकाळ्यात खरमाती टाकूनही कोणीही अटकाव केला नसल्याने संबंधिताने दहा ते बारा ट्रक खरमाती रंकाळ्याचा श्वास असलेल्या परताळ्याच्या कडेला आणून टाकली. महापालिका प्रशासनाने परताळा हा ‘ग्रीन झोन’ म्हणून राखीव ठेवला आहे. हा सर्व प्रकार म्हणजे परताळा गायब करण्याचा डाव असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. असा प्रकार पुन्हा घडून नये यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. (प्रतिनिधी)
ती खरमाती हटविली--लोकमतचा इफेक्ट
By admin | Updated: April 11, 2015 00:11 IST