सातारा : माहुली परिसरात एका अभागी महिलेवरील सामूहिक अत्याचारानंतर तिचा खून झाला. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने शुक्रवारी मध्यरात्री सातारा, शिरवळ अन् पुसेगावच्या सुनसान रस्त्यावर राबविलं तीन ठिकाणी धाडसी स्टिंग आॅपरेशन ! रात्रीच्या अंधारात तीन गावांत एकट्या जाऊन उभारल्या ‘लोकमत’च्या तीन महिला रिपोर्टर. त्यावेळी या तिघींना आला भयचकित करणारा थरारक अनुभव.सातारा शहरातील मुख्य बसस्थानक, जिल्हा परिषद, प्रकाश लॉज, गोडोली नाका या ठिकाणांवर हे स्टिंग आॅपरेशन करण्यात आले. साडेनऊ ते दीड या वेळेत ‘लोकमत’ टीमला रात्रगस्तीचे पोलीस आढळले नाहीत.या ‘स्टिंंग आॅपरेशन’मध्ये महिलांकडे वक्रदृष्टीने बघणाऱ्यांमध्ये चाळिशी ओलांडलेल्या पुरूषांची संख्या अधिक असल्याचे स्पष्ट झाले. महाविद्यालयीन युवकांचीही रात्री रस्त्यावर मोठी वर्दळ होती. अंधाराचा आडोसा घेऊन सिगारेट ओढणे, मोबाईलवर चाळे करणे आणि लांबूनच उत्सुकतेने पाहणे या पलीकडे या तरूणाईचे धाडस झाले नाही. मात्र या युवकांनी थेट वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांचा ठिय्या गाठला. रात्रीच्यावेळी एकटी महिला फिरतेय, हे पाहिल्यावर अनेकांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. चार-चारदा तिच्या शेजारून जाऊन तिने आपल्याशी बोलावे, यासाठी प्रयत्न करणाऱ्यांची संख्या इथे दिसली. तिच्याशी बोलतानाही तिच्या शरीरावर या पुरूषांची नजर फिरत होती. शिरवळ येथील पंढरपूर फाट्यावरही महिला प्रतिनिधीला असाच अनुुभव आला. रात्री ११.२० वाजता राष्ट्रीय महामार्गावरून सातारा बाजूकडे जाणारा एक कंटेनर संबंधित प्रतिनिधीकडे पाहत थोड्याच अंतरावर थांबला. कंटेनरमधून उतरून चालक खाली उतरला. आजूबाजूच्या परिसरात कानोसा घेऊन चालत टायर तपासण्याचे नाटक करू लागला; पण त्याचवेळेस त्याठिकाणी एक कार आल्याचे पाहून चालक निघून गेला. रात्री कुठं फिरता ? चला..आमच्या गाडीवर बसा !साताऱ्याच्या क्रीडा संकुल परिसरात प्रवासी बॅग घेऊन एकटं फिरणाऱ्या संबंधित महिला प्रतिनिधीला पाहून गाडीवरून जाणारे दोघे जण थांबले. ‘वायसी कॉलेजकडे जायचे आहे,’ असे प्रतिनिधीने स्पष्ट केल्यानंतर ‘मग चला आमच्या बरोबर.. आम्ही सोडतो,’ असे त्यांनी सांगितले. ‘पण एका गाडीवर आपण तिघे कसे जाणार ?’ असे विचारल्यानंतर ‘आमच्याकडे असे ट्रिपल सीट चालते’ असे म्हणत त्यांनी गाडीवर बसण्यासाठी गळच घातली. ‘साताऱ्यातील सगळी माणसं चांगली आहेत. विश्वास ठेवा,’ असेही त्यांनी दोन-दोनदा सांगितलं.
बुभुक्षित पुरुषांच्या नजरांच्या कोंडाळ््यात ‘ती एकटी’
By admin | Updated: January 18, 2015 00:21 IST