कोल्हापूर : ‘लोकमत’ बाल विकास मंच, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक मुंबई आणि महाराष्ट्र मिलिटरी स्कूल मुरबाड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शोध हा नवा शतजन्म शोधिताना’ हा वीर सावरकरांच्या तेजोमय जीवनावर व अलौकिक प्रतिभेवर आधारित पहिला भव्य कार्यक्रम रविवारी (दि. १४) कोल्हापुरातील राजाराम महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडला. या कार्यक्रमास सखी सदस्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.५० कलाकारांचा सहभाग असलेल्या या अडीच तासांच्या दृक्श्राव्य, संगीत, नृत्य कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे बहुमोल विचार निवेदनातून उलगडले गेले. सावरकरांनी रत्नागिरी येथे स्थानबद्ध असताना अस्पृश्यता निवारणाचे काम केले. सावरकरांनी लिहिलेल्या ‘जयोस्तुते’, ‘सागरा प्राण तळमळला’ या अजरामर गीतांबरोबरच त्यांनी लिहिलेली लावणी, पोवाडा याचे कार्यक्रमातून सादरीकरण झाले. सावरकरांनी चाफेकर बंधू, बाजीप्रभू देशपांडे यांच्यावर लिहिलेले पोवाडे ऐकून रोमांच उभे राहिले. स्वातंत्र्यवीर सावरकरांची छायाचित्रे, त्यांनी विविध ठिकाणी केलेल्या भाषणांची झलक, ‘वीर सावरकर’ चित्रपटातील दृश्ये या कार्यक्रमात पाहायला मिळाली. या कार्यक्रमाची संकल्पना, संहिता आणि निवेदन वृत्तनिवेदिका मंजिरी मराठे यांचे आहे. वृत्तनिवेदक भूषण करंदीकर हे सहनिवेदक होते. संगीत दिग्दर्शन वर्षा भावे यांनी, नृत्य दिग्दर्शन ज्येष्ठ कथ्थक नृत्यांगना रूपाली देसाई यांनी केले.वर्षा भावे, केतन पटवर्धन, मयूर सुकाळे, सोमेश नार्वेकर, सायली महाडिक, क्षीतिजा जोशी, अवंती बपोरीकर हे गायक, दीपक वेलणकर, अंजू आमडेकर हे कलाकार, संगीतकार कमलेश भडकमकर यांच्यासह विजय जाधव, हनुमंत रावडे, अमेय ठाकूर-देसाई, सचिन जगताप, सागर गिजरे हे वादक कार्यक्रमात सहभागी झाले होते. निर्मिती प्रमुख सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर आहेत. (प्रतिनिधी)
‘शतजन्म शोधिताना’ हाऊसफुल्ल
By admin | Updated: December 17, 2014 23:56 IST