कोल्हापूर : आजच्या काळात सोशल मीडिया जगतात पोस्ट, लाईक्स करण्यासाठी फ्रॅक्शन ऑफ सेकंदाची चढाओढ सुरू आहे. त्यामुळे चुकीची माहिती शेअर होणे, अफवा पसरणे, गैरसमज पसरणे असे प्रकार वारंवार घडत आहेत. प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र आहे. मात्र ते व्यक्त होत असताना त्याच्या पुढील परिणामांचाही विचार केला जात नाही. त्यामुळे अनेकदा अशा पोस्टला लाईक अथवा शेअर, फाॅरवर्ड करणे म्हणजे साक्षात कायद्याच्या कचाट्यात अडकून जेलची हवा खाण्याचीही पाळी येऊ शकते.
पूर्वी माध्यमे कमी असल्याने मर्यादा होत्या. त्यातून मिळणारा आनंदही तितकाच होता. आता आपला आनंद किंवा प्रतिक्रिया व्यक्त होताना भान राहत नाही. अनेक शब्दांचे बाण हातून सुटतात. अशावेळी आपण या माध्यमावर काय प्रतिक्रिया देऊन बसतो हे कळत नाही. त्यातून समाज मन दुखवण्याची शक्यता असते. त्यामुळे आजच्या काळात हे माध्यम जरी आभासी असले तरी त्यातून अनेकांशी संवाद घडत आहे. त्यातून चांगले तेच घेतले पाहिजे.
मुलींनो डीपी सांभाळा
-काही तरुणी तर समोरचा व्यक्ती कोण आहे हे न पाहता त्याच्यासोबत चॅटिंग करतात, असे अजिबात करू नये.
- फसवणूक झाल्यानंतर बदनामीच्या कारणातून अनेकदा पोलिसात तक्रार केली जात नाही. अशा फसवणुकीत तक्रार देण्यासाठी पुढे येणे काळाची गरज बनली आहे.
- तरुणींनी आपली छायाचित्रे व वैयक्तिक माहिती यावर अपलोड करू नये.
सोशल मीडियाचा वापर करा सांभाळून
या माध्यमाचा नेमका वापर कसा करावा, याची माहिती करूनच वापर करावा. अज्ञानामुळे वैयक्तिक फोटो, आक्षेपार्ह फोटोही शेअर होतात. फोटो मार्फ करून वापरले जाते. त्यातून बदनामी व ब्लॅकमेल होऊ शकते. त्यामुळे याचा वापर करताना पूर्ण माहिती करूनच करावा.
अशी घ्या काळजी
- या माध्यमावर वैयक्तिक माहिती शेअर करू नये
- या माध्यमात अनेक खाती बनावट असू शकतात. त्यामुळे अशा अनोळखी व्यक्तींना प्रतिसाद देऊ नये.
- कोणत्याही घटनेची शहानिशा न करता लाईक्स, पोस्ट अथवा ते पोस्ट फाॅरवर्ड करू नये.
- व्हाॅटसअपवर डीपी अनोळखी व्यक्तीला दिसू नयेत. याची सोय आहे. त्याचा वापर करावा.
सोशल मीडियावरील बदनामी, गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण कमी
सोशल मीडियावरून चुकीचे संदेश देणे, अफवा पसरविणे, गैरसमज होतील असे संदेश फाॅरवर्ड करणे आदी प्रकरणात गेल्या वर्षभरात एकही गुन्हा दाखल झालेला नाही. यापेक्षा बँकिंग फ्राॅडचे अनेक गुन्हे नोंद झाले आहेत.
कोट
व्हाॅट्सअप, फेसबुक अगर सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तीशी मैत्री किंवा चॅटिंग करू नये. त्यातून फसवणूक झाल्यास पोलीस ठाणे अथवा सायबर सेलशी संर्पक साधावा.
- शशिराज पाटोळे, पोलीस निरीक्षक, सायबर सेल, कोल्हापूर