घाटगे-पाटील ट्रान्स्पोर्ट या नामांकित संस्थेची नागाळ्यातील एका इमारतीत स्वातंत्र्यपूर्व काळात जयकुमार पाटील व वसंतराव घाटगे या दोघांनी सुरुवात केली. या दरम्यान संकेश्वरहून कामासाठी आलेल्या एका युवकाने हुशारी व कष्ट आणि चिकाटीच्या जोरावर कंपनीच्या प्रमुख पदापर्यंत झेप घेतली. हा युवक म्हणजे शंकरराव हे होते. या संस्थेच्या उभारणीत शंकररावांचे मोठे योगदान होते. त्यामुळे जयकुमार व वसंतराव यांचा त्यांच्यावर गाढ विश्वास होता. शंकरराव म्हणजे माणसांतील गुण ओळखण्यात पारंगत होते. त्यामुळे त्यांनी संस्थेत कनिष्ठ पदावर लागलेल्या अनेकांना घडवून त्यांच्यात व्यवस्थापक पदावर जाण्याची पात्रता निर्माण केली. त्यातून अनेकजण घडलेही. विशेष म्हणजे मालकांसोबत असलेली विश्वासार्हता जपत त्यांनी कर्मचाऱ्यांचेही कल्याण केले. त्यांनी कर्मचाऱ्यांसाठी घाटगे-पाटील कामगार सहकारी संस्थेची स्थापना केली. या संस्थेचे अध्यक्ष होते. घाटगे-पाटील उद्योग समूहातील भागीदारी संपुष्टात आल्यानंतर ते उद्योजक मोहन घाटगे, सतीश घाटगे यांच्याबरोबर काम करू लागले. एवढंच काय आजच्या पिढीबरोबरही त्यांनी काम केले. ट्रान्स्पोर्ट व्यवसायातील त्यांचा अनुभव मोठा होता. त्यामुळे कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात मालवाहतूक व्यवसायातील दिग्गज आसामी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. व्यवसायाच्या पलीकडेही त्यांचे अनेक सामाजिक संस्थांची संबंध होते. विशेषत: संयुक्त महाराष्ट्र हौसिंग सोसायटीचे अनेक वर्षे ते अध्यक्ष होते. रोटरी क्लबच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक कामे केली होती.
फोटो : ११०७२०२१-कोल-शंकरराव कुलकर्णी (निधन)