सिंधुदुर्गनगरी : नसलेल्या योजना अस्तित्वात असल्याचे जाहीर करून कामगारांना प्रलोभन दाखवत त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी निवारा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष शंकर लवू पुजारी (वय ६३), सरचिटणीस विजय रंगराव बचाटे (वय ४२, दोघे रा. सांगली) व त्यांचा सहकारी मंगेश नारिंग्रेकर (रा. नेरूर) यांच्यावर ओरोस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.ते म्हणाले, निवारा बांधकाम संघटना सांगलीतून काम करीत आहे. ही संघटना बेकायदेशीररीत्या पैसे गोळा करणे, कामगारांची दिशाभूल करणे, शासनाकडे अस्तित्वात नसलेल्या योजनांचे आमिष दाखवून कामगारांकडून सभासद नोंदणीसाठी प्रत्येकी ३०० रुपये व त्यापेक्षा जादा रक्कम घेऊन कामगारांची लूट करीत असल्याची तक्रार जिल्हा सरकारी कामगार अधिकारी शेखर पाडगावकर यांनी पोलीस स्थानकात केली होती. त्यानुसार ओरोस पोलीस ठाण्यात शंकर पुजारी, विजय बचाटे व मंगेश नारिंग्रेकर यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.सांगली येथील निवारा बांधकाम कामगार संघटनेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कामगारांना एकत्रित करून त्यांना शासकीय योजनांचे आमिष दाखविण्यात येत होते. (प्रतिनिधी)
शंकर पुजारीसह तिघांना फसवणूकप्रकरणी अटक
By admin | Updated: June 3, 2015 00:59 IST