गडहिंग्लज : उपनगराध्यक्षांच्या बैठकीची व्यवस्था बदलल्याच्या निषेधार्थ नगरपालिकेच्या सभेत तब्बल पाऊणतास गोंधळ झाला. उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले यांनी सभागृहात चक्क नगराध्यक्षांच्या खुर्चीच्या बाजूला जमिनीवरच बैठक मारली. या प्रकारामुळे पंचायत समिती पाठोपाठ पालिकेतील मानापमान नाट्याची शहरभर चर्चा झाली.नगराध्यक्ष राजेश बोरगावे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. सभेत अजेंड्यावरील २२ विषयांना चर्चेअंती मंजुरी देण्यात आली. सत्ताधारी आघाडीच्या नेत्या प्रा. स्वाती कोरींनी मांडलेला नागरिकांच्या नळांना मोफत मीटर बसविणेचा ठराव एकमताने मंजूर झाला. यावेळी उपनगराध्यक्षा चौगुले यांनीही हाच ठराव मांडण्याचा प्रयत्न केल्यामुळे गदारोळ झाला. त्यांनी लेखी ठराव नगराध्यक्षांकडे दिला. मागील सभेच्या कार्यवृत्तांवर चर्चा सुरू असतानाच दीपा बरगे यांनी बैठकीची व्यवस्था बदलून उपनगराध्यक्षांचा अवमान केल्याचा आरोप केला. उपनगराध्यक्षा चौगुलेंनी पूर्ववत आपल्या बैठकीची व्यवस्था करण्याची मागणी केली. त्यास नगराध्यक्षांनी ठाम नकार दिला. याच मुद्यावरून गोंधळाला सुरुवात झाली.सव्वाशे वर्षांची परंपरा असणाऱ्या पालिकेत असा प्रकार कधीच घडलेला नाही. महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान राखावा, अशी सूचना बरगेंनी केली. राष्ट्रवादीने विरोधी नगरसेवकांना पालिकेत बसायला जागा दिली नाही आणि पत्रकार परिषदेत आपल्याला बेडूक व सरड्याची उपमा दिली, त्यावेळी महिला नगरसेविकेचा अवमान झाला नाही का? असा सवाल कोरींनी केला.हिंदू-स्मशानभूमीचे विस्तारीकरण करावे, अशी सूचना हारुण सय्यद यांनी केली. लगतची खासगी जागा संपादित करून स्मशानभूमी विकासाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवावा, अशी सूचना भद्रापूर यांनी केली.बारामतीच्या धर्तीवर स्मशानभूमी व सांडपाण्यावरील वृक्षलागवड योजना राबवावी, अशी सूचना लक्ष्मी घुगरे यांनी मांडली. दोन्ही गटाच्या नगरसेवकांना बारामतीला पाठवून प्रकल्पाची माहिती घेऊ, त्यानंतर त्याबाबत निर्णय घेवूया, असेही नगराध्यक्षांनी सांगितले.कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांसाठी डॉ. जे. पी. नाईक यांच्या नावाने पुरस्कार सुरू करावा, अशी सूचना मंजूषा कदम यांनी, तर आदर्श वाचक पुरस्कार माजी नगराध्यक्ष भिकाजीराव मोहिते यांच्या नावाने द्यावा, अशी सूचना कोरींनी केली.नियोजित पोलीस चौक्यांसाठी जागा उपलब्ध करून देण्यास आणि संकेश्वर रोडवर वारणा बँकेतर्फे पिक-अप-शेड उभारण्यास मंजुरी देण्यात आली. नगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश, दप्तर, बूट व शैक्षणिक साहित्य देण्याचा निर्णय झाला.प्रशासनाची बाजू मुख्याधिकारी तानाजी नरळे यांनी सांभाळली. चर्चेत किरण कदम, रामदास कुराडे, बसवराज खणगावे, नितीन देसाई यांनी भाग घेतला. सर्व नगरसेवक व खातेप्रमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी)महिला पदाधिकाऱ्याच्या अपमानाचा आरोपसभागृहात नगराध्यक्षांच्या शेजारीच उपनगराध्यक्षांच्या बैठकीची व्यवस्था असली पाहिजे, असे कोणत्याही कायद्यात नमूद नाही. आपण खाली बसावे अशी सूचना नगराध्यक्षांनी केली. महिला पदाधिकाऱ्याचा अपमान केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला, तर त्या प्रसिद्धीसाठीच स्टंटबाजी करत असल्याचा आरोप नरेंद्र भद्रापूर यांनी केला. यावेळी आरोप-प्रत्यारोपांची जुगलबंदी रंगली.
‘मानापमाना’वरून गदारोळ
By admin | Updated: July 23, 2015 00:31 IST