मुरलीधर कुलकर्णी --कोल्हापूर शहरातल्या दसरा चौकातील वाहतूक नियंत्रण केंद्रापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या फूटपाथवर तो अनेक दिवस पडून होता. दिवस-रात्र पावसात भिजत असल्याने त्याची तब्येत खालावत चालली होती. नाव विचारले तर तो हेमंत साळोखे असे सांगायचा; पण घरचा पत्ता मात्र त्याला सांगता येत नव्हता. त्याच्या करुण कहाणीचं वर्णन करणारी बातमी शुक्रवारच्या हॅलो कोल्हापूरमध्ये प्रसिद्ध होताच कोल्हापुरातल्या 'सावली केअर सेंटर' या सेवाभावी संस्थेने त्याला प्रतिसाद दिला. संस्थेने त्या इसमाला दाखल करून घेतले असून त्याच्या राहण्या- खाण्याची चांगली सोय केली आहे. शुक्रवारी सकाळी ‘लोकमत’च्या हॅलो कोल्हापूर पुरवणीतील बातमी वाचून सावली केअर सेंटरच्या किशोर देशपांडे यांनी लोकमत कार्यालयात सकाळी ९.३0 वाजता फोन केला अन् अनाथ हेमंतच पालकत्व स्वीकारण्याची इच्छा व्यक्त केली. ११ च्या सुमारास संस्थेची रुग्णवाहिका आणि चार कर्मचाऱ्यांना त्यांनी पाठवून दिले. या रुग्णवाहिकेतून हेमंतला संभाजीनगरमधील सावली केअर सेंटरमध्ये आणण्यात आले. येथे त्याचे वाढलेले केस, नखे कापण्यात आली. गरम पाण्याने अंघोळ घालण्यात आली. तसेच नवीन कपडेही घालण्यास देण्यात आले. काही वेळाने गरम चहा व जेवणही देण्यात आले. संस्थेत येताच काहीशी कुरकुर करणाऱ्या हेमंतची स्वारी नंतर मात्र सुखावली. आता तो मजेत आहे. त्याच्या आयुष्यातली फरफट आता थांबली आहे. एका अनाथाचे पालकत्व आनंदाने स्वीकारुन त्याला नवजीवन देणाऱ्या ‘सावली केअर सेंटर’ या सेवाभावी संस्थेचे हे काम निश्चितच अभिनंदनीय आहे यात शंका नाही.दरम्यान हेमंतला फूटपाथवरुन सावली संस्थेत आधार मिळाल्याने जयंती नाल्याला लागून असलेल्या परिसरातील अनेक नागरिकांनी समाधान व्यक्त केले. अनेकजण त्याला पाहून रोज हळहळ व्यक्त करीत होते. उन्हा-पावसात जर तो सतत राहिला असता तर त्याच्या जीवाला नक्कीच धोका पोहोचला असता असेही अनेकांनी बोलून दाखवले.
अनाथ ‘हेमंत’ला मायेची ‘सावली’
By admin | Updated: July 9, 2016 00:22 IST