कोल्हापूर : महाविद्यालयातील पूर्ववैमनस्यातून धनगर समाज क्रांतिकारक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विलास वाघमोडेंचा मुलगा उन्मेश (वय १७) याचा दोन लाखांची सुपारी देऊन रचलेला खुनाचा कट राजारामपुरी पोलिसांनी शिताफीने आज, मंगळवारी उघडकीस आणला. याप्रकरणी राजेंद्रनगरमधील एसएमजी ग्रुपच्या सात गुंडांना अटक केली. संशयित म्होरक्या संतोष देवदास मोटे (१९), सचिन ऊर्फ अमोल सूर्यवंशी (२६), संग्राम मधुकर सोनवणे (१८), इरफान बाबर शेख (१८), महावीर बापू लोंढे (१८, सर्व रा. राजेंद्रनगर झोपडपट्टी) आदींसह दोन बालगुन्हेगारांचा समावेश आहे. फरारी जुबेर ऊर्फ पिंट्या किल्लेदार याला पुरळप पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले, उन्मेश वाघमोडे हा विवेकानंद कॉलेजमध्ये शिकत आहे. त्याचे मित्र अमन मणेर व शोएब मणेर यांचे पार्थ पाटील (रा. नागाळा पार्क) याच्याशी महाविद्यालयात पूर्ववैमनस्य आहे. यातून उन्मेश याने त्याला मित्रांना दमदाटी करू नकोस म्हणून सांगितले होते. याचा राग त्याला आल्याने त्याने ओळखीचा जुबेर किल्लेदार याला उन्मेशला संपवायचे आहे, मला कोण मदत करेल असे विचारले. त्यावर त्याने राजेंद्रनगरमधील एसएमजी ग्रुपचा म्होरक्या संतोष मोटे याची भेट घालून दिली. यावेळी त्याला ठार मारण्यासाठी दोन लाखांची सुपारी देण्याचे ठरले. त्यानुसार सुरुवातीस तीस हजार रुपये दिले. काम झाल्यानंतर उर्वरित रक्कम देण्याचे ठरले. सुपारी घेतल्यानंतर मोटे याने त्याला फोनवरून ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकाराची माहिती उन्मेशने वडिलांना सांगितली. त्यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमृत देशमुख यांना या प्रकाराची माहिती देऊन मुलाच्या जिवितास धोका असल्याची तक्रार २९ डिसेंबर २०१४ रोजी दिली. त्यापासून गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सचिन पंडित, आण्णापा कांबळे, राजू वरक, इकबाल महात, किरण गवळी, मिलींद नलवडे, वैभव दड्डीकर, सुनील घोसाळकर, राजू होळी, गौरव चौगुले, अशोक पाटील, निवास पाटील, आदींनी संशयित संतोष मोटे याच्या हालचालीवर पाळत ठेवली. दरम्यान, मोटे याने आपल्या टोळीतील सचिन सूर्यवंशी, जुबेर किल्लेदार, संग्राम सोनवणे, इरफान शेख, महावीर लोंढे याच्यासह आणखी एका बालगुन्हेगारांना पैशाचे आमिष दाखवून उन्मेश याचा गेम करायचा आहे, त्यासाठी तो कुठे जातो, बसतो-उठतो याची माहिती घेण्यास सांगितले. त्याचे मित्र अमन व शोएब यांना भेटून ते उन्मेश कुठे भेटेल, अशी विचारणा करून दमदाटी करीत होते. पोलिसांनी मोटेसह त्याच्या अन्य साथीदारांना आज ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवित त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी कटाची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी त्यांच्यावर कलम १२० (बी) नुसार सुपारी देऊन खुनाचा कट रचणेचा गुन्हा दाखल केला.
खुनाची सुपारी घेणाऱ्या सात गुंडांना अटक
By admin | Updated: January 14, 2015 01:24 IST