सातारा : सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीचा सचिव रघुनाथ वामन मनवे यास आज, मंगळवारी लाचलुचपत विभागाने गाळ्याच्या मोबदल्यात ३० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. एका ज्येष्ठ नागरिकाने केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई झाली. मनवे यांनी यापूर्वी या तक्रारदाराकडून २० हजार रुपये घेतले असून, दुसऱ्या टप्प्यांत ३0 हजार रुपये घेताना तो जाळ्यात अडकला. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्ह्यात सहकार क्षेत्रात केलेली ही दुसरी मोठी कारवाई आहे. तक्रारदाराचा सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीत भाडेपट्ट्यावर गाळा होता. बाजार समितीने आता तेथे नवीन व्यापारी संकुल बांधले आहे. तेथे तक्रारदाराला गाळा दिला होता. त्यामुळे भाडेपट्टा गाळ्याची ‘अलॉटमेंट’ करण्यासाठी केलेल्या मदतीचा भाग म्हणून सचिन रघुनाथ मनवे (वय ४९, रा. मनवेवाडी, पो. अंबवडे बुद्रुक, ता. सातारा) याने तक्रारदाराकडे ५0 हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराने मनवे यास नाइलाजास्तव २0 हजार रुपये दिले होते.मात्र, या नगरपरिषदेत तक्रारदार व त्यांच्या मुलीचे नाव भोगवटादार म्हणून लावण्यासाठी बाजार समितीचा ना हरकत दाखला लागणार होता. त्यासाठी तक्रारदाराने ३0 हजार रुपये द्यावेत म्हणून मनवेने तगादा लावला होता. यामुळे तक्रारदाराने ४ डिसेंबरला लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार दिली.या तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी करून सापळा रचला. मनवे याने तक्रारदाराला आज, मंगळवारी सायंकाळी चार वाजता त्याच्या कार्यालयात पैसे घेऊन बोलावले. तक्रारदार मनवेच्या दालनात पैसे घेऊन गेला आणि ते घेत असतानाच तो रंगेहात पकडला गेला. (प्रतिनिधी) मनवेवाडी येथील घराची झडतीरघुनाथ मनवे मूळचा सातारा तालुक्यातील मनवेवाडी येथील असून, तेथे त्याचे घर आहे. साताऱ्यात शाहूपुरी परिसरात त्याचा ‘शिवराज’ बंगला आहे. मनवेस ताब्यात घेतल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी मनवेवाडी येथील घराची आणि शिवराज बंगल्याची झाडाझडती घेत होते. तेथे काही आक्षेपार्ह कागदपत्रे सापडल्याची माहिती समोर आली आहे. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. दरम्यान, ‘शिवराज’ बंगल्याला मात्र कुलूप होते. कारवाई करूनच दिवस साजरादरवर्षी ९ डिसेंबर हा ‘आंतरराष्ट्रीय लाचलुचपत प्रतिबंधक दिन’ म्हणून साजरा केला जातो. नेमके याच दिनाचे औचित्य साधून सातारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक श्रीहरी पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी खऱ्या अर्थाने ‘आंतरराष्ट्रीय लाचलुचपत प्रतिबंधक दिन’ साजरा केला.
बाजार समितीचा सचिव लाच घेताना जाळ्यात
By admin | Updated: December 9, 2014 23:26 IST