कोल्हापूर : शहरातील इयत्ता अकरावी प्रवेशाच्या दुसरी फेरी आज, सोमवारपासून सुरू होणार आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी नव्याने अर्ज करता येणार आहे. केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीकडे अर्ज केलेले अद्याप ६८५६ विद्यार्थी हे प्रवेशित शिल्लक आहेत. त्या जागांसाठी दुसऱ्या फेरीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
पहिल्या फेरीमध्ये कोणतेही महाविद्यालय अलॉट झाले नाही, अशा विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीत निश्चितपणे प्रवेश मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना अर्जामध्ये बदल करावयाचा आहे, त्यांनी आपला पूर्वीचा अर्ज संकेतस्थळावर लॉगिन करून दुसऱ्या फेरीमध्ये रद्द करावा. नवीन अर्ज प्रक्रिया शुल्कासह भरावा. ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही रजिस्टर भाग एक, दोन भरलेला नाही. त्यांना नव्याने ऑनलाईन अर्ज करता येईल. ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीमध्ये महाविद्यालय अलॉट होऊन त्यांनी प्रवेश निश्चित केलेला नाही. अर्जाच्या भाग दोनमध्ये कोणताही बदल करणार नाहीत, त्यांची नावे दुसऱ्या फेरीमध्ये ऑटो शिफ्ट होणार आहेत. या फेरीत अर्ज करण्याची अंतिम मुदत बुधवार (दि. १६) पर्यंत आहे. अर्जांची छाननी १७ ते १९ डिसेंबर या कालावधीत होईल. २१ डिसेंबरला निवड यादी प्रसिद्ध होईल. त्यानंतर प्रत्यक्ष प्रवेशाची कार्यवाही दि. २१ ते २३ डिसेंबरदरम्यान होणार आहे.
आकडेवारी दृष्टिक्षेपात
एकूण प्रवेश क्षमता : १४६८०
दाखल अर्ज : १२६९१
पहिल्या फेरीत झालेले प्रवेश : ५८३५
प्रवेशित शिल्लक विद्यार्थी : ६८५६.