कोल्हापूर : पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर डोंगर कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर आता कोल्हापूर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले असून, जिल्ह्यातील डोंगरदऱ्यांत, डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या गावांचा शोध, तसेच तेथील घरांची शोधमोहीम हाती घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी बाराही तालुक्यांतील तहसीलदार व प्रांतांना दिले आहेत. गावांची माहिती आणि करावयाच्या उपाययोजनांसह दोन दिवसांत अहवाल सादर करावेत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे. दरम्यान, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनानेही अशा घटनांशी मुकाबला करण्यासाठी आवश्यक असणारे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे.एका विहित नमुन्यात ही माहिती गोळा करावयाची आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गावाचे नाव, वाडीवस्तीचे नाव, घरांची संख्या, कुटुंबांची संख्या, लोकसंख्या किती याची माहिती गोळा केली जाणार आहे. ही सर्व माहिती गोळा करून जर अशी गावे असतील त्यांची पर्यायी व्यवस्था काय करता येईल, याचे नियोजनासह अहवाल येत्या दोन दिवसांत सादर करायचे आहेत.--जिल्हा आपत्ती व्यवस्थापनही माळीण दुर्घटनेनंतर सक्रिय झाले आहे. या विभागाने जिल्ह्यात अशी घटना घडलीच, तर त्यासाठी लागणारे जेसीबी, क्रेन यांची यादी तयार केली आहे. --जिल्ह्यात ५०० जेसीबी, तर १०० क्रेनमालकांच्या नावांची यादी तालुका व गावनिहाय तयार करण्यात आली आहे. मात्र, त्यांचे फोन क्रमांक मिळाले नसून, तेही गोळा केले जात आहेत.--गावपातळीवर अस्तित्वात असलेल्या आपत्ती व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील १०२९ गावांतील प्रत्येकी १०० व्यक्तींंच्या फोन क्रमांकांची यादी तयार केली आहे. --कोणतीही घटना घडली तर त्या ठिकाणी कमीत कमी वेळात जेसीबी, क्रेन पाठविता येईल, अशी व्यवस्था आता तयार केली आहे.
डोंगरदऱ्यांतील गावांची प्रशासनाकडून शोधमोहीम
By admin | Updated: August 1, 2014 00:36 IST