कोल्हापूर : महानगरपालिकेच्या परवाना विभागाच्यावतीने शुक्रवारी जीवनावश्यक दुकाना व्यतिरिक्त सुरू असलेली नऊ दुकाने सील करून कोविड मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांना दणका दिला.
कोविड १९ आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन करून जीवनावश्यक वस्तू विक्रीच्या दुकानाव्यतिरिक्त इतर दुकाने सुरू केल्यास ती सील करण्याची कारवाई परवाना विभागामार्फत सुरू आहे. तरीही कोरोनाचे गांभीर्य न लक्षात घेता काही दुकानदारांनी आपला व्यवसाय सुरू ठेवल्याचे शुक्रवारी निदर्शनास आले.
यामुळे परवाना, अतिक्रमण व केएमटी विभागाच्या पथकाने एसटी स्टॅंड परिसरातील महालक्ष्मी चेंबर्समधील महादेव मोबाइल शॉपी, हार्दिक ॲक्सेसरीज, राधेश्याम मोबाइल शॉपी, अवतार मोबाइल शॉपी, आनंद मोबाइल शॉपी, साई इलेक्ट्रॉनिक्स, महालक्ष्मी मोबाइल शॉपी, बालाजी मोबाइल शॉपी, तेजम मोबाइल शॉपी या नऊ दुकानांवर सीलबंद करण्याची कारवाई केली. ही कारवाई परवाना अधीक्षक रामचंद्र काटकर, अतिक्रमण विभाग प्रमुख पंडित पोवार, सुनील जाधव व कर्मचारी यांनी केली.
शहरातील व्यवसायधारकांनी कोविड-१९ च्या शासन निर्देशांचे पालन करून कायदेशीर कटू प्रसंग टाळावेत, असे आवाहन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.