आजरा : २० पटाखालील शाळा बंद करणे ग्रामीण विद्यार्थ्यांकरिता शिक्षणाचे दरवाजे बंद करण्यास कारणीभूत ठरणार असून, शासनाने हा निर्णय रद्द करावा, या मागणीसाठी पेंढारवाडी ग्रामस्थांनी आजरा तहसील कार्यालय व आजरा पंचायत समितीसमोर मोर्चाने जाऊन पंचायत समिती कार्यालयासमोरच पालक व विद्यार्थ्यांची शाळा भरवली.यावेळी कॉ. शिवाजी गुरव म्हणाले, या निर्णयातून शासनाचा दुबळेपणा स्पष्ट होत आहे. राज्य व केंद्र सरकारचा कारभार म्हणजे माकडाच्या हातात कोलीत देण्याचा प्रकार आहे. अत्यंत पोरकटपणाचे निर्णय शासन घेत आहे. २० पटाच्या आतील शाळा बंद करून ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रकार आहे. शासनाने आपला निर्णयावर फेरविचार करावा, अन्यथा पुन्हा एकवेळ महात्मा जोतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांची भूमिका सर्वसामान्य शिक्षित मंडळींना घ्यावी लागणार आहे. अन्यथा ग्रामीण व आदिवासी भागातील आदिवासी वस्त्या, पाडे, दुर्गम भाग येथील बालके शिक्षणापासून वंचित राहणार आहेत.गाव तिथे शासकीय शाळा व वर्ग तेथे शिक्षक या धोरणानुसार वीस पटाखालील शाळा बंद करण्याच्या धोरणाला विरोध असल्याचे स्पष्ट केले.यावेळी निवासी नायब तहसीलदार बी. डी. कोळी व गटविकास अधिकारी ए. डी. कांबळे यांना निवेदन देऊन पंचायत समिती आवारात शाळा भरविण्यात आली.आंदोलनामध्ये शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष साहेबराव लोखंडे, लक्ष्मण लोहार, तुकाराम आजगेकर, एकनाथ आजगेकर, गीतांजली शिंत्रे, संगीता आजगेकर, रंजना आजगेकर, अनिल आजगेकर यांच्यासह ग्रामस्थ, मुले सहभागी झाले होते. आंदोलन ठिकाणी सुभाष विभूते, संयोगीता सुतार, सुनिल सुतार यांनी भेट दिली. (प्रतिनिधी)
पेंढारवाडीकरांनी भरवली पंचायत समितीत शाळा
By admin | Updated: November 20, 2015 00:04 IST