कोल्हापूर : शहरातील ३८ किलोमीटरच्या रस्त्यासाठी १०८ कोटींचा निधी उपलब्ध असूनही गेली चार वर्षे अंतर्गत रस्त्यांचे काम रखडले आहे. कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रशासन व पदाधिकार्यांना याप्रश्नी कानपिचक्या दिल्याने आज (गुरुवार) अधिकार्यांना समवेत घेत महापौर सुनीता राऊत व स्थायी समितीचे सभापती सचिन चव्हाण यांच्यासह पदाधिकार्यांनी ‘नगरोत्थान’च्या कामांची पाहणी केली. सुभाषनगर रोडच्या खराब कामांबाबत उपशहर अभियंता एम. एम. निर्मळे यांना खराब रस्त्यांबाबत पदाधिकार्यांनी अक्षरश: धारेवर धरले. पदाधिकार्यांनी कामाच्या पाहणीचा फक्त देखावा नको, तर शेवटपर्यंत प्रामाणिक पाठपुरावा करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. केंद्र सरकारच्या नगरोत्थान योजनेतून मंजूर झालेल्या रस्त्यांची कामे करण्यात ठेकेदारांनी असमर्थता दर्शविल्यामुळे शहरातील अकरा रस्त्यांच्या कामांची चार भागांत विभागणी करून काढलेल्या फेरनिविदेकडेही त्यांनी पाठ फिरविली आहे. यापूर्वीच्या ठेकेदारांनी ‘पाकीट’ संस्कृतीमुळेच कामातून अंग काढून घेतले होते. रस्त्याचा दर्जापेक्षा मला किती मिळाले, हा नियम लावला गेल्याने शहरातील सर्वच रस्त्यांची वाट लागली. ‘स्थायी’सह महासभेत ठेकेदारांवर कारवाईची फक्त घोेषणाच झाली. प्रत्यक्ष कारवाई न होण्यामागे नगरसेवक व प्रशासनाचे रस्त्याखाली हात अडकल्याची चर्चा आहे. गृहराज्यमंत्री सतेज पाटील व कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी काही महिन्यांपूर्वी अनेक ठेकेदारांना रस्त्याची कामे करण्याबाबत विनंती केली होती. नगरसेवक व प्रशासनातील अधिकार्यांच्या आर्थिक मागणीमुळे ठेकेदारांनी प्रतिसादच दिला नाही. आता रस्त्यांची कामे रखडल्याने पदाधिकार्यांनी प्रशासनाच्या अधिकार्यांसह पाहणीचा ‘स्टंट’ केला. या पाहणीतून प्रत्यक्षात काहीही साध्य होणार नसल्याची चर्चा आहे. ठेकेदारांनी पळ काढल्यानंतर नगरसेवक व पदाधिकार्यांना जाग आली. सुरुवातीपासूनच या प्रकल्पाकडे ‘आंबा’ म्हणूनच पाहिले. रस्त्यांच्या दर्जाकडे लक्ष दिलेच नाही. वेळीच लक्ष दिले असते तर प्रकल्प दोन वर्षांपूर्वीच पूर्ण झाला असता, अशी प्रतिक्रिया येत आहे. एनसीसी कॅम्प ते प्रतिभानगर, नार्वेकर मार्केट ते सुभाषनगर चौक व राजोपाध्येनगर, आदी परिसरातील रस्त्यांची पाहणी पदाधिकार्यांनी केली. रस्त्यांच्या कामात प्रचंड चुका आढळून आल्या. रस्त्यांची उंची, डांबराचे अत्यल्प प्रमाण, हॉटमिक्सऐवजी हातानेच केलेला रस्ता, रोलिंगचा अभाव यामुळे आताच रस्त्याची खडी निघत असल्याचे पदाधिकार्यांच्या ध्यानात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचे मान्य केले. आर. ई. इन्फ्रा या ठेकेदारास तत्काळ सूचना देण्यात आल्या. त्यानंतर रंकाळा परिसरातील भुयारी ड्रेनेज लाईनच्या कामाची सद्य:स्थिती जाणून घेऊन ठेकेदार व प्रशासनास काम त्वरित पूर्ण करण्याबाबत सूचना दिल्या. यावेळी उपमहापौर मोहन गोंजारे, परिवहन सभापती वसंत कोगेकर, प्रभाग समिती सभापती संगीता देवेकर, वंदना आयरेकर, नगरसेवक चंद्रकांत घाटगे, मुरलीधर जाधव, अजित पवार, शारंगधर देशमुख, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, आदी उपस्थित होते. नगरोत्थानमधील रखडलेले रस्ते यल्लमा मंदिर ते कंदलगाव नाका, इराणी क्रशर खण ते अंबाई टँक, दत्त मंगल कार्यालय, टिंबर मार्के ट कमान ते राजाराम चौकामार्गे जुना वाशी नाका, एनसीसी आॅफिस ते कॉमर्स कॉलेज हॉस्टेल महादेव मंदिर, जमदग्नी ऋषी ते नेहरुनगर आयसोलेशन, हॉकी स्टेडियम चौक ते रामानंदनगर, पाचगाव; जगतापनगर-पाचगाव ते जरगनगर, एसएससी बोर्ड ते राजेंद्रनगर, नार्वेकर मार्के ट ते रेड्याची टक्करमार्गे सुभाषनगर, शाहूपुरी पाचवी गल्ली व्यापारी पेठ रोड, राजारामपुरी मेनरोड जनता बाजार ते मारुती मंदिर, एनसीसी आॅफिस ते मालती अपार्टमेंट, सिद्धार्थनगर मुख्य रस्ता ते स्मशानभूमी, रंकाळा स्टँड ते दुधाळी, शिंगणापूर नाका, शिंगणापूर नाका ते नलिनी बझार, राजीव गांधी पुतळा ते परीख पूल, व्हीनस कॉर्नर, कोंडा ओळ, महाराणा प्रताप चौक ते महापालिका, सेनापती बापट मार्ग ते विद्यापीठ रोड, मार्के ट यार्ड ते जाधववाडी, शिरोली नाका मार्के ट यार्ड कंपौड ते लोणार वसाहत, वायचळ पथ रुईकर कॉलनी ते लिशा हॉटेल, टेंबलाई रेल्वे गेट ते लोणार वसाहत, सेंट्रल बिल्डिंग ते लाईन बाजार भगवा चौक, भगवा चौक रेणुका मंदिर ते कागलवाडी, महावीर कॉलेज चौक ते न्यू पॅलेस नाईक मळा, रुईकर कॉलनी टॉवर ते महाडिक माळ दत्त मंदिर, महाडिक माळ दत्तमंदिरासमोरचा रस्ता, दानत हॉटेल मुख्य रस्ता.
दिखाऊ नगरोत्थानच्या पाहणीचा ‘देखावा’ पदाधिकारी रस्त्यावर : मंत्र्यांच्या कानपिचक्यांनंतर झाला खराब रस्त्यांचा साक्षात्क ार; उपशहर अभियंत्यांना धरले धारेवर
By admin | Updated: May 9, 2014 00:25 IST