कोल्हापुरातील पहिल्या पंचतारांकित हॉटेल ‘सयाजी’चे उद्घाटन आज, गुरुवारी होत आहे. शेती, शिक्षण, तंत्र व वैद्यकीय शिक्षणामध्ये अग्रेसर असलेल्या डॉ. डी. वाय. पाटील गु्रपने ‘डीवायपी’ हॉस्पिटॅलिटीच्या माध्यमातून आता हॉटेल व्यवसायातही पहिलेच पाऊल टाकले आहे. या हॉटेलमुळे कोल्हापूरचे नावही एका वेगळ्या उंचीवर जाणार आहे. कोल्हापूरच्या एकूण विकासालाही ते पूरक ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर ‘डीवायपी’ हॉस्पिटॅलिटीचे चेअरमन डॉ. संजय डी. पाटील यांनी उलगडून सांगितलेली ही ‘सयाजी’ची मेकिंग स्टोरी...पंचतारांकित सुविधा!पंचतारांकित हॉटेल म्हटल्यावर त्याचे दर ऐकूनच लोकांना भीती वाटते, असे निदर्शनास आणून दिल्यावर संजय पाटील म्हणाले, ‘त्याचा आम्ही विचार केला आहे. आम्ही सुविधा पंचतारांकित दर्जाच्याच देऊ, परंतु दर सर्वांना परवडतील असेच असतील.’प्रश्न : महाराष्ट्रातला एक नावाजलेला शिक्षण समूह ते हॉटेल व्यवसायातील पदार्पण हा प्रवास कसा सुरू झाला..?उत्तर : डी. वाय. पाटील गु्रप म्हणून आमची जी काही आतापर्यंतची वाटचाल झाली, त्याचे सगळे श्रेय ‘डी.वाय.’ या दोन अक्षरांत सामावलेले आहे. दादांची दूरदृष्टी व आईचा आशीर्वाद यामुळेच आम्ही जीवनात अनेक महत्त्वाचे टप्पे यशस्वीपणे पार करू शकलो. दादांना एक सवय आहे, ते नेहमी एकाच विषयात अडकून राहत नाहीत. एकाचवेळी अनेक विषयांवर विचार करीत राहणे हा त्यांचा स्वभाव आहे. त्याच स्वभावाचे काही गुण वारसा म्हणून माझ्यामध्येही आले असल्याने मी देखील सतत वेगवेगळ्या ट्रॅकवर विचार करीत असतो. त्यातूनच हॉटेलचा विचार मनात आला. आता सर्वांच्या सहकार्यातून हे स्वप्न पूर्ण होत असल्याचा आनंद आहे. ताराराणी चौकात कोल्हापूर शहराच्या प्रवेशद्वाराशेजारीच हे हॉटेल उभारले आहे.प्रश्न : मराठी माणूस हॉटेल व्यवसायात फारसा नाही, मग आपण या व्यवसायाकडे कसे वळलात....?उत्तर : हॉटेल व्यवसायात अत्यंत विचारपूर्वक पाऊल टाकले आहे. या व्यवसायात पाऊल ठेवण्यापूर्वी मुलगा ऋतुराज याला हॉटेल इंडस्ट्रीजमधील शिक्षण घेण्यासाठी दिल्ली आणि मॉरिशिसला पाठविले. त्याने हॉटेलमधील सगळी कामे स्वत: केली आहेत. हॉटेलच्या उभारणीत आम्ही कुठेही गुणवत्तेशी तडजोड केलेली नाही. जगभरातील पंचतारांकित हॉटेलच्या तोडीचे हॉटेल आम्ही उभारले आहे. हॉटेल व्यवसाय यशस्वी होण्यासाठी दोन-तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात. तुमचे आदरातिथ्य (हॉस्पिटॅलिटी), निवांतपणा आणि जेवणाचा दर्जा. कोल्हापूर शहराची या तिन्ही बाबतीत जगभर वेगळी ओळख आहे. जोडीला या ऐतिहासिक नगरीत पर्यटकांना पाहण्यासारख्याही खूप चांगल्या गोष्टी आहेत. त्यामुळे गोव्याहून मुंबईला जाणाऱ्या परदेशी पर्यटकांच्यादृष्टीने आता कोल्हापूर हे महत्त्वाचे डेस्टिनेशन ठरू शकेल. विदेशी पर्यटकांना उत्तम जेवण व स्वीमिंग पूलची गरज असते. त्याची पूर्तता आम्ही ‘सयाजी’मध्ये केली आहे.प्रश्न : हॉटेलशिवाय तुम्ही आणखी काही पूरक गोष्टींचा विचार केला आहे का..?उत्तर : हो, नक्कीच केला आहे. सयाजी हॉटेल म्हणजे नुसते हॉटेल नाही. एक हब म्हणून आम्ही विचार केला. त्यामुळे हॉटेल तर आहेच, शिवाय तिथे सगळ्या प्रकाराचे जगभरातील नावाजलेले ब्रँडस् उपलब्ध असलेला मॉल असेल. त्याच्या जोडीला ‘पीव्हीआर’ सिनेमा कंपनीची तीन थिएटर्स असतील. त्याची प्रत्येकाची आसन क्षमता २६० इतकी आहे. विविध समारंभासाठी दोन ‘बॅन्क्विटिस’ असतील. सुमारे ८० हजार चौरस फुटांहून जास्त जागा असलेले ओपन थिएटर कम लॉन असेल. कॉर्पोरेट कंपन्यांच्या मिटिंगसाठी दोन बिझनेस मिटिंग हॉल उपलब्ध आहेत. तुम्ही एकदा ‘सयाजी’मध्ये पाय ठेवला की खरेदी, जेवण, व्यायाम, मनोरंजन व महत्त्वाच्या बैठकाही या नव्या जगाच्या सगळ्या गरजा तिथे पूर्ण होऊ शकतील.प्रश्न : हॉटेल म्हणून तुम्ही कोणत्या गोष्टींकडे अधिक लक्ष दिले..?उत्तर : हॉटेलचे बांधकाम, इंटेरिअर डिझायनिंग याशिवाय सगळ्या सोयी-सुविधा अगदी सहजपणे उपलब्ध होतील याकडे आम्ही लक्ष दिले आहे. पंचतारांकित हॉटेल व्यवस्थापनातील आघाडीचा ब्रँड असलेला ‘सयाजी’ हे त्याचे व्यवस्थापन पाहणार आहे. लोकांना काय हवे हे ओळखण्याची ‘सयाजी’ची खासियत आहे. चांगली सेवा देण्यात त्यांचे कायमच प्राधान्य राहिले आहे. आम्ही ज्या उत्तम दर्जाचे हॉटेल उभारले आहे, तसे हॉटेल पुण्यापासून बंगलोरपर्यंत कुठे नाही. १३० प्रशस्त रूम्स, हेलिपॅडची सोय, जीम, स्पा, चोवीस तास सुरू असेल असे ‘ब्लू लोटस्’ रेस्टारंट, फूड कोर्ट आणि बरेच काही..आता कोल्हापुरात कुठेही गेले तर कार पार्किंग ही डोकेदुखी बनली आहे. आम्ही एकावेळेला ३४० गाड्या पार्क होतील अशी पार्किंग व्यवस्था केली आहे. लग्न समारंभापासून कॉन्फरन्सपर्यंत आणि वाढदिवस ते व्यावसायिक गेटटुगेदरपर्यंतचे सगळे छोटे-मोठे कार्यक्रम करण्याची व्यवस्था येथे करण्यात आली आहे. एकाच वेळी चार हजारांहून अधिक लोकांची व्यवस्था होऊ शकेल अशी बॅन्क्विट लोकेशन्स येथे उपलब्ध आहेत. त्यामुळे लोकांना समारंभासाठी ठिकाण शोधण्यासाठी पुणे, महाबळेश्वरला जावे लागणार नाही. प्रश्न : या हॉटेलमुळे कोल्हापूरच्या विकासामध्ये काही मदत होऊ शकेल का..?उत्तर : हो नक्कीच. आमचा प्रयत्न तर तसाच आहे. या हॉटेलमध्ये सुमारे चारशे तरुणांना काम दिले जाणार आहे. पंचतारांकित हॉटेल व विमानसेवा या दोन गोष्टी कोणत्याही शहराच्या वाटचालीतील महत्त्वाचे टप्पे असतात. त्यातील एक टप्पा आम्ही पूर्ण केला आहे. त्यामुळे विमानसेवा सुरू होण्यासही मदत होऊ शकेल. या हॉटेलमध्ये येणाऱ्या पर्यटकांना आम्ही कोल्हापुरातील जे जे चांगले आहे, ते दाखविण्याचे टूर पॅकेज करणार आहोत. त्यामुळे येथील पर्यटन विकासाला चालना मिळू शकेल. या हॉटेलला जोडून ‘आयटी’ सेक्टर विकसित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. बंगलोरच्या काही कंपन्यांशी आम्ही संपर्क साधत आहोत. एखादा चांगला गु्रप मिळाला तर त्यांच्यासाठी स्वतंत्र ११ मजली टॉवर बांधून देण्याची आमची तयारी आहे. कोल्हापूरसारख्या शहरातही इतक्या उत्तम दर्जाचे पंचतारांकित हॉटेल होऊ शकते, ती या शहराची ताकद आहे, हेच आम्ही यातून दाखवू शकलो याचाही आनंद आहे.- विश्वास पाटील
‘सयाजी’ची मेकिंग स्टोरी...
By admin | Updated: April 2, 2015 00:38 IST