कोल्हापूर : विधान परिषदेच्या काँग्रेसच्या उमेदवारीच्या स्पर्धेत सतेज पाटील आणि जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्यातच जोरात चुरस असल्याचे समजते. या स्पर्धेतून विद्यमान आमदार महादेवराव महाडिक यांचे नाव थोडे बाजूला पडले असल्याचे चित्र आहे. माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी उमेदवारी मागितली आहे; परंतु ते स्वत:च विदेशात गेले असल्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना मर्यादा आल्या आहेत. पी. एन. पाटील व सतेज पाटील हे दोघेही मुंबईतच तळ ठोकून गाठीभेटी घेत आहेत. विद्यमान आमदार म्हणून महाडिक यांनी उमेदवारीसाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. मात्र, या वेळेला महाडिक यांना उमेदवारीसाठीच जास्त संघर्ष करावा लागत आहे. महाडिक हे गेली अठरा वर्षे या जागेचे प्रतिनिधित्व करीत आहेत. पहिल्यांदा त्यांनी ही निवडणूक अपक्ष म्हणून लढविली. दुसऱ्यांदा काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिल्यावर निवडणूक बिनविरोध झाली व गत निवडणुकीत त्यांची जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रा. जयंत पाटील यांच्याशी लढत झाली. त्यामध्ये महाडिक हे ४२ मतांनी विजयी झाले. त्यांना १९५, तर जयंत पाटील यांना १५३ मते मिळाली. त्या निवडणुकीवेळीही महाडिक यांना उमेदवारी मिळू नये यासाठी सतेज पाटील यांनी प्रयत्न केले होते; परंतु त्यावेळी दिवंगत नेते सदाशिवराव मंडलिक यांनी वजन वापरल्याने महाडिकांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला होता. या वेळेला सर्वच बाजूंनी त्यांच्याविरोधात परिस्थिती आहे. त्यांचा एक मुलगा भाजपचा आमदार आहे. त्यांनी काँग्रेसच्याच माजी राज्यमंत्र्याचा पराभव केला आहे. दुसऱ्या मुलाची ताराराणी आघाडी ही महापालिका निवडणुकीत थेट काँग्रेसच्याच विरोधात लढली आहे. महाडिक हे जरी ‘मी काँग्रेसविरोधात काम केले नाही,’ असे सांगत असले तरी ते कुणाच्या विजयासाठी झटत होते, ती गोष्टही लपून राहिलेली नाही. निकालानंतर राष्ट्रवादीला सोबत घेऊन काँग्रेसला सत्तेपासून रोखण्याचे प्रयत्न झाले. या सगळ्या गोष्टींचा पाढा प्रदेशाध्यक्षांपासून अगदी पक्षाच्या केंद्रीय समितीपर्यंत वाचला गेला आहे. शिवाय काँग्रेसची उमेदवारी मिळाली नाही तर महाडिक गप्प बसणार नाहीत ते किंवा त्यांचा मुलगा बंडखोरी करणार, हेदेखील पक्षापर्यंत गेले. त्यामुळेच त्यांची उमेदवारीची वाट बिकट बनली आहे. गॉडफादर नसल्याने पी.एन. यांच्यावर मर्यादा पी. एन. पाटील हे दिवंगत नेते व माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे खंदे समर्थक मानले जातात; परंतु देशमुख यांच्या निधनानंतर पाटील यांना दिल्लीच्या राजकारणात तसा खंदा गॉडफादर राहिलेला नाही; त्यामुळे तिथे त्यांच्यासाठी लॉबिंग करण्यावर मर्यादा येत आहेत. महापालिकेतील यशामुळे दावा प्रबळ देशात भाजपची लाट असतानाही कोल्हापूर महापालिकेत ती थोपवून काँग्रेसचा महापौर करण्यात यश आल्याने सतेज पाटील यांचा उमेदवारीच्या स्पर्धेतील दावा प्रबळ मानला जात आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांशी त्यांचा असलेला समन्वय हीदेखील जमेची बाजू आहे. शिवाय प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांच्याशीही सतेज पाटील यांचे चांगले संबंध आहेत. समझोत्याचा उमेदवार म्हणून नाव पुढे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांचीही पक्षात ‘निष्ठावंत नेता’ अशी ओळख आहे. समझोत्याचा उमेदवार म्हणून त्यांचे नाव पुढे आले आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर कोल्हापुरातील सगळी काँग्रेस राष्ट्रवादीमय झाली होती. तेव्हा पाटील यांनी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारून काम सुरू केले. पक्षाच्या पडत्या काळात निष्ठेने काम केल्याने पक्षाने आपला विचार करावा, असे त्यांचे प्रयत्न आहेत.
सतेज, पी. एन. यांच्यातच चुरस
By admin | Updated: November 19, 2015 01:10 IST